नवी दिल्ली - कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (मंगळवारी) 'दिल्ली कोरोना' हे मोबाईलआधारित अॅप्लिकेशन लॉन्च केले. या अॅपद्वारे नागरिकांना दिल्लीतील सर्व रुग्णांलयांची माहिती मिळणार आहे, त्याबरोबरच खासगी किंवा सरकारी कोणत्या रुग्णालयात किती खाटा उपलब्ध आहेत? त्यातील किती शिल्लक आहेत? याचीही माहिती मिळणार आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी यावेळी सांगितले.
नागरिकांसाठी 1031 हा हेल्पलाईन नंबरही जारी करण्यात आला. काही ठिकाणी नागरिकांनी अपुऱ्या वैद्यकीय सुविधा आणि रुग्णालयात खाटांची कमतरता असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. मात्र, नागरिकांपर्यंत माहिती पोहोचत नसल्याचे दिसून येत आहे. दिल्लीत 4 हजार 100 खाटा उपलब्ध आहेत. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती टाळण्यासाठी अॅपद्वारे नागिरांना ही माहिती देण्यात येणार आहे, असे केजरीवाल म्हणाले.
एखाद्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नसेल, तर त्याने हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांचा सामना करण्यासाठी दिल्ली सज्ज आहे. डॉक्टरांनी एखाद्या रुग्णाला घरी क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला तर तो त्यांनी पाळावा, असे केजरीवाल म्हणाले.