नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणी दिल्लीतील एका न्यायालयाने, नीती आयोगाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधूश्री खुल्लर यांना जामीन मंजूर केला आहे. त्यांच्यासह या प्रकरणातील इतर आरोपींनाही जामीन देण्यात आला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या खटल्याप्रकरणी त्यांना जामीन मिळाला आहे.
यासोबतच, विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहार यांनी अर्थमंत्र्यांसाठी विशेष काम करणारे माजी अधिकारी प्रदीप कुमार बग्गा आणि एफआयपीबीचे संचालक प्रबोध सक्सेना यांचाही जामीन मंजूर केला. दोन लाख रुपयांच्या दंडावर या सर्वांना जामीन मंजूर करण्यात आला. यावेळी या सर्व आरोपींना देश सोडून जाण्यापासून मनाई करण्यात आली. तसेच, याप्रकरणासंबंधी पुराव्यांशी छेडछाड न करण्याचे निर्देशही त्यांना देण्यात आले.
देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना याप्रकरणी आधीच जामीन मिळाला आहे. १५ मे २०१७ला सीबीआयने परदेशी गुंतवणूक संवर्धन मंडळाच्या कामकाजातील अनियमिततेबाबत तक्रार दाखल केली होती. २००७ मध्ये चिदंबरम केंद्रीय अर्थमंत्री असताना 'आयएनएक्स' या माध्यमसमूहाला ३०५ कोटी रुपयांचा विदेशी निधी मिळाला होता.
हेही वाचा : 'डोनाल्ड ट्रम्प म्हणजे काय प्रभू श्रीराम आहेत काय?'