नवी दिल्ली - 'सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात दिल्लीचा मुख्यमंत्री नाही तर एक सर्वसामान्य नागरिक या नात्याने जाण्याचे नियोजन केले होते. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाणार होतो. मात्र, त्यांना (केंद्र सरकार) माझ्या नियोजनाबाबत माहिती मिळाली असावी, त्यामुळे त्यांनी मला तिकडे जाऊ दिले नाही, असे अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत. मुख्यमंत्री केजरीवाल यांना गृहकैदेत ठेवल्याचा आरोप आपने केंद्र सरकारवर केला आहे.
पोलिसांनी फेटाळले आरोप
आम आदमी पक्षाने केलेला आरोप दिल्ली पोलिसांनी फेटाळून लावला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर तैनात केलेला फौजफाटा दैनिंदिन सुरक्षेप्रमाणेच आहे. मुख्यमंत्री निवसास्थानासोबत आम्ही समन्वय साधत आहोत. ज्या व्यक्तींना ते आत सोडण्याची विनंती करत आहेत, त्यांना आम्ही आतमध्ये सोडत आहोत, असे दिल्लीचे उत्तर विभागाचे पोलीस उपायुक्त आंतो अल्फान्सो म्हणाले.
मनीष सिसोदियांचे ठिय्या आंदोलन
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांना गृहकैदेत ठेवल्याचा आरोप त्यांनी दिल्ली पोलिसांवर केला आहे. त्याविरोधात त्यांचे आंदोलन सुरू आहे.केजरीवाल आज सिंघू सीमेवर शेतकरी आंदोलकांना भेटण्यास गेले होते. त्यानंतर त्यांना गृहकैदेत ठेवल्याचा आरोप आपने केला आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. मुख्यमंत्र्यांना नरजकैदेत ठेवले नसून त्यांच्या घरी कोणीही जाऊ शकते, असे पोलिसांनी म्हटले आहे.
भारत बंदला प्रतिसाद
मुख्यता पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांनी चक्का जाम करत महत्त्वाचे रस्ते सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळात बंद केले. दुकाने आणि बाजारपेठाही बंद आहेत. अनेक राज्यात वाहतूक व्यवस्थाही कोलमडली आहे. भारत बंदचा सर्वात जास्त परिणाम पंजाब, हरयाणा आणि दिल्ली राज्यात झाला आहे. पश्चिम बंगाल, बिहार आणि ओडिशा राज्यात अनेक ठिकाणी आंदोलकांनी रेल्वे अडवल्या आहेत. दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात शेतकरी जमले असून पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.