नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे बंद असलेली दिल्लीतील पर्यटन स्थळे सोमवारपासून पुन्हा खुली झाली आहेत. तब्बल तीन महिन्यांनी दिल्लीतील कुतुब मिनार, हुमायूनची कबर, लाल किल्ला यांसह इतर संरक्षित वास्तू पर्यटकांसाठी खुली झाली आहेत.
यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचे सर्व नियम, तसेच स्वच्छतेचे सर्व नियम पाळणे अनिवार्य केले आहे. तसेच, मास्क घातल्याशिवाय कोणालाही आतमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही.
दिल्लीमध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) अंतर्गत सुरक्षित असणाऱ्या एकूण १७३ वास्तू आहेत. यांमध्ये युनेस्कोच्या तीन जागतिक वारशांचाही समावेश आहे. लाल किल्ला, हुमायूनची कबर, कुतुब मिनार, सफदरजंग कबर, पुराना किला, तुघलकाबाद किल्ला आणि फिरोज शाह कोटला या काही वास्तू प्रसिद्ध आहेत.
सांस्कृतिक मंत्रालयाने दिलेल्या निर्देशांनुसार, सोमवारपासून (६ जुलै) ही सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली होतील. केवळ लाल किल्ल्याची साप्ताहिक सुट्टीच सोमवारी असल्यामुळे तो बंद राहील, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. सकाळ सत्र आणि दुपार सत्र अशा दोन सत्रांमध्ये पर्यटक तिकिटे आरक्षित करु शकतात. एका सत्रामध्ये जास्तीत जास्त १,५०० पर्यटकांनाच परवानगी मिळणार आहे.
साधारणपणे लाल किल्ल्याला एका दिवसात आठ ते १२ हजार पर्यटक भेट देतात; हुमायूनच्या कबरीला सहा ते दहा हजार पर्यटक आणि कुतुब मिनारला आठ ते दहा हजार पर्यटक दररोज भेट देतात. एएसआयच्या देखरेखीखाली असणाऱ्या ३,६९१ वास्तू या १७ मार्चपासून बंद आहेत.
हेही वाचा : सिंगापूरमध्ये उघडणार थिएटर्सचे दरवाजे, १५ जुलैला झळकणार 'पेनीन्सुला'