नवी दिल्ली – देशात टाळेबंदी 1 खुली होताना राजधानीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाहून होणाऱ्या विमान उड्डाणांची संख्या वाढली आहे. विमान सेवा सुरू झालेल्या पहिल्या दिवशीपासून (25 मे) ते 17 जूनपर्यंत एकूण 6 हजार 600 विमानांची उड्डाणे झाली आहेत.
महामारीला आटोक्यात आणण्यासाठी देशांतर्गत बंद असलेली विमान वाहतूक सेवा 25 मे रोजीपासून सुरू करण्यात आली आहे. तसेच विदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी वंदे भारत मिशन पुन्हा सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी एअर इंडियाचे विमान जगाच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी उड्डाण घेत आहेत.
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (आयजीआय) आकडेवारीनुसार 25 मे ते 17 जूनपर्यंत या 24 दिवसात 6 हजार 600 देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय सेवेसाठी विमानांनी उड्डाण केली आहेत. या दिवसामध्ये सुमारे 6 लाख, 80 हजार प्रवासी इच्छितस्थळी पोहोचले आहेत. यामध्ये 40 हजार प्रवासी 'वंदे भारत मिशन'मधून मायदेशी येणारे होते.
कोरोनाचा संसर्ग होवू नये, याकरता आयजीआय येथे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मोबाईलमध्ये आरोग्य सेतू व चेहऱ्यावर मास्क नसेल तर प्रवाशांना विमानतळावर प्रवेश दिला जात नाही. प्रवाशांमध्ये शारीरिक अंतर ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.
विमानतळावर सतत स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात येते. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. प्रवाशांच्या बॅग व पादत्राणांवर जंतूनाशक फवारले जाते. विमानतळावर रोज एकूण 300 लिटरचेे जंतूनाशक (सॅनिटायझर) आणि हँडवॉश वापरण्यात येत आहे.