नवी दिल्ली - केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज मोठा निर्णय घेत संरक्षण खाते आत्मनिर्भर भारत अभियानासाठी सज्ज असल्याचे म्हटले. संरक्षण मंत्रालयाने 101 उत्पादनांची यादी तयार केली असून यांच्या आयातीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. मात्र, सिंह यांच्या या घोषणेवर ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी टीका केली आहे. संरक्षण मंत्र्यांनी फक्त मोठ्या आवाजात घोषणा केली असून संरक्षण साहित्याचा एकमेव आयातदार संरक्षण मंत्रालयच आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
आज(रविवारी) सकाळी संरक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतल्याचे आश्वासन दिले. मात्र, याचा शेवट एका रडक्या आणि दबक्या आवाजातील घोषणेने झाला. संरक्षण साहित्य एकमेव संरक्षण मंत्रालयच आयात करते. आयातीवर स्थगिती लावणं म्हणजे स्वत: मंत्रालयावरच स्थगिती लावण्यासारखं आहे, अशी खोचक टीका चिदंबरम यांनी केली.
संरक्षण मंत्र्यांनी रविवारी ऐतिहासिक घोषणा केल्याचे म्हटले. मात्र, ही घोषणा फक्त एका कार्यालयीन आदेशासारखी आहे. आयात स्थगितीची घोषणा ही फक्त मोठ्या आवाजातील पोकळ घोषणा ठरली. आज जे साहित्य मंत्रालय आयात करत आहे, ते पुढील 2 ते 4 वर्षात आम्ही देशात बनविण्याचा प्रयत्न करु आणि मग आयात थांबवू, असा याचा अर्थ असल्याचे चिदंबरम म्हणाले.
देशांतर्गत संरक्षण उद्योगाला चालना देण्यासाठी संरक्षण मंत्र्यांनी आज मोठी घोषणा केली. 101 शस्त्रे आणि लष्करी सामुग्रीची मंत्रालयाने यादी केली असून त्याच्या आयातीला स्थगिती दिली आहे. आत्मनिर्भर भारतसाठी संरक्षण मंत्रालय सज्ज असल्याचे त्यांनी म्हटले. 2020 ते 2024 या काळात आयातीला स्थगिती देऊन देशी उद्योगांना कंत्राटे देण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काळात 4 लाख कोटींची कंत्रादे देशांतर्गत उद्योगांना संरक्षण साहित्य तयार करण्यासाठी देण्यात येतील, असे त्यांनी ट्विटवरून जाहीर केले.