कोलकाता - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह दोन दिवसीय पश्चिम बंगाल आणि सिक्कीम दौऱ्यावर आहेत. सिक्कीम येथील गंगटोक-नाथुला रोडचे सिंह यांच्याहस्ते उद्घाटन झाले. आर्मी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) या लष्कराच्या संस्थेकडून हा रस्ता बांधण्यात आला आहे. दार्जिलिंगच्या सुकना येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राजनाथ यांनी रस्त्याचे उद्घाटन केले. पर्यायी रस्त्याचे उद्घाटन करताना मला अत्यंत आनंद होत असल्याची प्रतिक्रिया सिंह यांनी यावेळी व्यक्त केली. पूर्व सिक्कीम आणि लष्करातील लोकांची इच्छा पूर्ण झाली असल्याचेही सिंह म्हणाले. १९.३५ किलोमीटरचा हा पर्यायी रस्ता बांधल्यामुळे सिंह यांनी अभिनंदन केले. सिक्कीमच्या सीमांवरील जवळपास अनेक रस्ते बीआरओकडून बांधण्यात येत असल्याची माहितीही सिंह यांनी दिली.
पूर्व सिक्कीममध्ये ६५ किलोमीटर रस्त्याचे काम सुरू आहे तसेच अधिक ५५ किलोमीटर रस्ते बनवण्याची योजना आहे. भारतमाला प्रकल्पातंर्गत या रस्त्यांची कामे सुरू असल्याची माहिती आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कामकाज वाखाणण्यासारखे आहे. राज्याच्या प्रमुखांकडून बीआरओला विशेष पाठिंबा मिळाला त्यामुळे ही कामे होऊ शकली असेही सिंह म्हणाले.
पूर्व हिमालय भारतासाठी मोक्याचा
पूर्व हिमालयातही भारताची चीनबरोबर सीमा आहे. २०१७ साली चीनसोबत या भागात वाद झाला होता. सध्या लडाखमध्ये भारत-चीन सीमावाद सुरू असल्याने भारतीय लष्कराकडून संबंध सीमेवर लष्ककाराची तयारी सुरू आहे. संरक्षण मंत्री या भागातील सैन्याच्या तयारीचा आढावा घेणार आहेत, तसेच जवानांचे मनोबल वाढविणार आहेत. ईशान्य भारत आणि पूर्व हिमालयावर चीनचा कायमच डोळा राहिला आहे. त्यामुळे भारताने या भागातही सज्जता वाढविली आहे. डोकलामवरून दोन्ही देशांमध्ये वाद झाला होता. तर संपूर्ण अरुणाचल प्रदेशवर चीनने दावा सांगितला आहे.
जुलै महिन्यात केला लडाख दौरा
राजनाथ सिंह यांनी जुलै महिन्यात लष्कराचे मनोबल वाढविण्यासाठी लडाखचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी लुकुंग पोस्ट येथील जवानांशी संवाद साधला होता. लुकुंग हे ठिकाण पाँग्यांग त्सो तळ्याच्या पश्चिमेकडून असून दोन्ही सैन्यामध्ये धुमश्चक्री झाली, तेथून 40 किमीवर आहे. तर मोदींनी लडाखमधील निमू येथील लष्करी चौकीला 3 जुलैला भेट दिली होती.