नवी दिल्ली - लडाखमधील गलवान व्हॅलीत भारत-चीन सीमावाद चिघळल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एकामागोमाग एक अशा दोन उच्चस्तरीय बैठका घेतल्या. यामध्ये लडाखमधील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. दोन्ही देशाच्या सैनिकांमध्ये झालेल्या हाणामारीत एका अधिकाऱ्यासह दोन जवानांना वीरमरण आले आहे. त्यानंतर तणाव आणखीनच वाढला आहे.
राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदींना जवानांची हत्या आणि लडाखमधील परिस्थितीची सर्व माहिती दिली. पाच आठवड्यांपासून पूर्व लडाख भागात दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने उभे ठाकले आहे. चीनने भारतीय हद्दीत अनधिकृतरित्या प्रवेश केल्यानंतर हा वाद सुरु झाला आहे.
पहिल्या उच्चस्तरीय बैठकीला परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, सरसेनाध्यक्ष बिपीन रावत आणि तिन्ही सैन्यदल प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत पूर्व लडाख भागातील जमिनीवरील परिस्थितीचा विस्तृत आढावा घेण्यात आला, तसेच कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्करी तयारीचा आढावा घेण्यात आला.
या घटनेनंतर प्योंगयोंग त्सो, गलवान व्हॅली, डेमचोक, आणि दौलत बेग औल्डी भागात भारत लष्करी कुमक वाढविण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येते. एक तासाच्या बैठकीनंतर राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदींना परिस्थितीची माहिती दिली.
दुपारी पुन्हा संरक्षण मंत्र्यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे आणि सरसेनाध्यक्ष बिपीन रावत यांच्यासोबत दुसरी बैठक घेतली. लष्करप्रमुख नरवणे यांनी संरक्षण मंत्र्यांना सोमवारी घडलेल्या घटनेचा अत्यंत तपशिलवार अहवाल सादर केल्याची माहिती समजली आहे.
पूर्व लडाख भागातील सीमावाद सोडविण्यासाठी दोन्ही लष्करांमध्ये उच्चस्तरीय बैठका सुरु झाल्या होत्या. लेह येथील 14 कॉर्प्सचे अधिकारी लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांनी चीनच्या तिबेट मिलिटरी डिस्ट्रिक्टचे अधिकारी मेजर जनरल लीयू लीन यांच्यात 6 जूनला सुमारे 7 तास बैठक झाली. चीनने आपले सैन्य माघारी घेवून 'जैसे थे' परिस्थिती सीमेवर ठेवावी ही भारताची मागणी आहे.