बंगळुरू : कर्नाटकच्या बेल्लारी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दाम्पत्याने कर्जाला कंटाळून आपल्या दोन लहानग्या मुलांना तलावात ढकलून दिले. यात या दोन्ही चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चिरंजीवी आणि नंदिनी यांचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना खुशी (३) आणि चिरू (१) ही दोन मुले होती. आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे या दोघांनी मुलांसोबत आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. आधीच ठरवल्याप्रमाणे हे दोघेही मुलांना घेऊन तळ्यामध्ये गेले आणि आपल्या दोन्ही मुलांना त्यांनी तलावात फेकले.
त्यानंतर कोण आधी उडी मारणार यावरुन त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यामुळे त्यांच्यापैकी कोणीच तलावात उडी मारली नाही. सुमारे तासभर वाद घातल्यानंतर, आपली गाडी आणण्यासाठी म्हणून चिरंजीवी तेथून निघून गेला, आणि परत आलाच नाही. त्यानंतर घाबरून नंदिनीने आपल्या नातेवाईकांना फोन केला, आणि मुले तलावात बुडाल्याचे सांगितले.
यानंतर गुडेकोटे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुलांचे मृतदेह आणि चिरंजीवी यांचा शोध घेणे सुरू आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.