गुवाहाटी - आसामच्या गोलाघाट आणि जोराहात जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्यामुळे तब्बल ८३ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १०० हून अधिक लोक गंभीर आजारी पडले आहेत. कालपर्यंत मृतांचा आकडा ४० पर्यंत होता. आता मृतांच्या संख्येत वाढ होऊन हा आकडा ८३ वर पोहोचला आहे. या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आसामच्या वैद्यकीय विभागाने याबाबतची माहिती दिली. कालपासून (शुक्रवार) सातत्याने मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा वाढत आहे. अजूनही यातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शुक्रवारी सुरुवातीला मृतांची संख्या १२ होती. मात्र, रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्यानंतर मृतांच्या संख्येत वाढ झाली, अशी माहिती अतिरिक्त उपायुक्त धीरज यांनी दिली.
येथील अनेक लोकांनी गुरुवारी रात्री एका दुकानातून दारू विकत घेऊन प्यायली होती. यानंतर यातील अनेक लोक आजारी पडले होते, असे स्थानिकांनी सांगितले. अजूनही यातील बरेच जण रुग्णालयात दाखल झालेले नाहीत, असेही सांगितले जात आहे. तसेच पोलीस आणि अवैधरित्या दारू विक्रेत्यांमध्ये मिलीभगत असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे.
प्रशासनाकडून याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. ४ अधिकाऱ्यांच्या पथकाची स्थापना करून ३ दिवसांत याविषयीचा तपास अहवाल सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.