नवी दिल्ली - अरबी समुद्राच्या मध्यपूर्व भागात मागील दोन दिवसांपासून निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तयार झालेल्या "वायू" या चक्रीवादळाने आपला मोर्चा महाराष्ट्राकडून गुजरात राज्याकडे वळवला आहे. त्यामुळे गुजरात राज्याला आज सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात गेल्या काही दिवासांपासून तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे 'वायु' चक्रीवादळ निर्माण झाले झाले आहे. आज हे वादळ गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. १३ जूनपर्यंत हे वादळ गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावरील पोरबंदर आणि कच्छच्या प्रदेशात पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुजरात सरकारला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी या चक्रीवादळाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाला सुरक्षेसाठी ठोस पावले उचलत पूर्व उपायोजना राबवण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकार गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक तसे किनाऱ्यावरील सर्व केंद्रशासीत प्रदेशांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन (एनडीआरएफ) दलाच्या २६ तुकड्या किनारी प्रदेशात तैनात करण्यात आल्या आहेत. एका तुकडीत ४५ जवान आहेत. तसेच संरक्षक नौका, दूरसंचार उपकरणे यांनी हे दल सज्ज आहे. गुजरातच्या विनंतीनुसार एनडीआरएफ अतिरिक्त १० तुकड्या पाठवणार आहेत. गृहमंत्र्यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना परिस्थितीचा आढावा घेऊन लोकांना सुरक्षीत ठिकाणी हलवण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.
गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार चक्री वादळादरम्यान वीज, टेलीफोन, आरोग्य, आणि पिण्याचे पाणी यांसारख्या सेवा कार्यरत ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या सेवांमध्ये अडथळा आल्यास तत्काळ उपाययोजना राबवणार असल्याचेही गृहमंत्राल्यातर्फे सांगण्यात आले.