नवी दिल्ली - तामिळनाडू आणि पाँडेचरीच्या किनारपट्टीवर रविवारी फनी सायक्लॉन(चक्रीवादळ) येऊन धडकणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी अतिवृष्टीची शक्यता असल्याची माहिती शुक्रवारी भारतीय हवामान खात्याने दिली आहे. तसेच तामिळनाडूत बहुतेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.
पुढील २४ तासात बंगालच्या दक्षिणपश्चिम खाडी आणि हिंद महासागरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर या वादळामुळे येत्या ७२ तासामध्ये आंध्र आणि दक्षिण पूर्व किनारपट्टीवर तसेच आंध्रप्रदेशच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याच्या अधिकाऱयांनी वर्तविली आहे. समुद्राची स्थितीवरून २६ ते ३० एप्रिल दरम्यान तीव्र पावसाची शक्यता आहे. दरम्यान या वादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने ३० एप्रिल ते १ मे च्या काळावधीत हाय अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाकडून या वादळाच्या हालचालींचे सातत्याने निरिक्षण करण्यात येत असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याच्या चेन्नई क्षेत्रीय संचालक एस बालचंद्रन यांनी दिली आहे. तसेच वातावरणातील कमी दाब क्षेत्राच्या प्रणालीचेही निरीक्षण करण्यात येत आहे. एर्नाकुलम, इडुक्की, थ्रिसुर, आणि मल्लापूरमसारख्या भागातही अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.