नवी दिल्ली - पटपडगंज मतदारसंघातून दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि भाजपचे रवींद्र सिंह नेगी यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. सकाळी अकरा वाजेपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, सिसोदियांना १३,८४४ मते मिळाली होती, तर नेगी यांना १५,२७१ मते मिळाली होती. मात्र, दुपारी मतमोजणीच्या तेराव्या फेरीनंतर सिसोदियांनी मुसंडी मारत विजय प्राप्त केला आहे.
दिल्लीमधील केजरीवाल यांच्या नवी दिल्ली मतदारसंघानंतर आपसाठी प्रतिष्ठेचा असा मतदारसंघ म्हणजे पटपडगंज आहे. १९९३ साली झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपने पटपडगंजवर विजय मिळवला होता. त्यानंतर बरीच वर्षे ही जागा काँग्रेसकडे होती. त्यानंतर २०१३ आणि २०१५ मध्ये लागोपाठ दोन वर्षे ही जागा सिसोदिया यांच्याकडे राहिली आहे.
आज सकाळी आठ वाजल्यापासून दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीचे जे आकडे समोर आले आहेत, त्यामध्ये आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसून येत आहे. भाजप बऱ्याच प्रमाणात पिछाडीवर आहे, तर काँग्रेसला एकाही जागेवर आघाडी मिळवता आली नाही.
हेही वाचा : दिल्ली विधानसभा निवडणूक : भाजपने स्वीकारली हार? प्रदेश कार्यालयातील सूचक पोस्टर..