नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी विनय शर्माने सर्वोच्च न्यायालयात निकालानंतर फेरयाचिका (क्युरेटीव्ह पिटिशन) दाखल केली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयात आज(मंगळवारी) निकाल देण्यात येणार आहे. 'दोषी विनय शर्माची फेरयाचिका नाकारली जाईल', असा विश्वास निर्भयाच्या आईने व्यक्त केला आहे.
दिल्लीत २०१२ साली निर्भया बलात्कार प्रकरणाने अख्खा देश हादरून गेला होता. याप्रकरणी न्यायालयाने नुकतेच चार दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. २२ जानेवारीला त्यांना फाशीची शिक्षा दिली जाणार आहे, मात्र, दोषी विनय शर्माने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत फेरयाचिका दाखल केली आहे. त्यावर आज निकाल दिला जाणार आहे.
दरम्यान निर्भयाच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे. शिक्षा लागू होण्यास दिरंगाई करण्यासाठीच दोषीने फेरयाचिका दाखल केली आहे. त्याची याचिका नाकारली जाईल, अशी माझी आशा आहे. २२ जानेवारीला सर्व दोषींना फाशीची शिक्षा होऊन निर्भयाला न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
'माझे कुटुंब अतिशय गरीब असून तुटपुंज्या पैशावर जीवन जगत आहेत. न्यायालयीन प्रक्रियेमुळे त्यांच्याकडे आता काहीही शिल्लक राहिले नाही, जर मला मृत्यूदंडाची शिक्षा झाली तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल', असे विनय शर्माने फेरयाचिकेमध्ये म्हटले आहे. वरिष्ठ वकील सी. अगरवाल आणि ए. पी सिंह यांनी आरोपीच्या वतीने याचिका दाखल केली आहे.
निर्भया सामूहिक बलात्कारप्रकरणी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने चारही आरोपीं विरोधात डेथ वॉरंट जारी केले आहे. २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता आरोपींना फासावर लटकवले जाणार आहे. त्यानुसार तिहार तुरुंग प्रशासनानं फाशीच्या शिक्षेची तयारी केली असून आरोपींच्या डमी पुतळ्यांना फाशी देण्याचे ट्रायल सुरू केले आहे. तुरुंगामध्ये आरोपींच्या वजनाप्रमाणे पुतळ्यामध्ये रेती-दगड भरून एक डमी व्यक्ती तयार करण्यात येते. त्यानंतर डमी व्यक्तीला फाशी देण्यात येते. आरोपींना फाशी देताना वापरण्यात येणारा दोर त्यांच्या वजनानं तुटू नये, यासाठी डमी तयार करून फाशी देण्याच्या शिक्षेचा अभ्यास केला जातो.
आरोपींना तुरुंग क्रमांक 3 मध्ये फाशी देण्यात येणार आहे. मेरठ तुरुंगातील जल्लाद पवन हे दोषींना फासावर लटकवणार आहेत. 4 ही आरोपींना एकाचवेळी फाशी देण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये जल्लाद बोलावण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.