नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. हा अर्थसंकल्प केवळ काही बड्या लोकांवर लक्ष देतो, आणि लघु व मध्यम उद्योजकांचा पूर्णपणे भ्रमनिरास करतो, असे गांधी म्हणाले.
एमएसएमई कामगारांकडे पाठ..
मोदींच्या 'क्रोनी सेंट्रिक' अर्थसंकल्पामध्ये लघु व मध्यम उद्योजकांना कमी व्याजदर असणारे कर्ज देण्यात आले नाही, तसेच त्यांना जीएसटीमध्येही काही सवलत देण्यात आली नाही. देशात सर्वात जास्त एमएसएमई कामगार असूनही, हा अर्थसंकल्प त्यांच्याकडे पाठ फिरवतो, असे राहुल यांनी ट्विट करत म्हटले.
भारतातील मालमत्ता भांडवलशाही मित्रांना..
यापूर्वी त्यांनी नरेंद्र मोदी हे भारतातील मालमत्ता आपल्या भांडवलशाही मित्रांना देण्याची योजना आखत असल्याचे म्हटले होते. तसेच, अर्थसंकल्पातून सामान्यांच्या हातात काहीच रक्कम मिळत नसल्याचे म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली होती.
सरकारने देशातील बेरोजगारी कमी करण्यासाठी लघु व मध्यम उद्योग, शेतकरी आणि कामगारांना पाठिंबा द्यायला हवा, असेही गांधी यापूर्वी म्हणाले होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारीला संसदेमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला होता, ज्याला आवाजी मतदानाने मंजूरी मिळाली होती.
हेही वाचा : मिशन आत्मनिर्भर! तेजस लढाऊ विमानांसह लष्करी सामुग्रीच्या निर्यातीस मंजुरी