हैदराबाद- भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. 63 हजार 490 रुग्ण वाढल्यामुळे देशातील कोरोना रुग्णसंख्या 25 लाख 89 हजार 600 वर पोहोचली आहे. 18 लाख 62 हजार 258 जण कोरोनामुक्त झाले आहेत. रविवारपर्यंत कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 71.91 टक्के एवढा झाला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार 49980 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 944 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 7 ऑगस्टपासून भारतात 60 हजारांपेक्षा कोरोना रुग्ण आढळून येत आहेत.फक्त 11 ऑगस्टला 53 हजार 601 कोरोना रुग्ण वाढले होते. भारतातील कोरोनाने होणारा मृत्यू दर 1.93 टक्के एवढा झाला आहे. सध्या 6 लाख 77 हजार 444 जणांवर उपचार सुरु आहेत.
महाराष्ट्र-
मुंबई- राज्यात रविवारी 8 हजार 837 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण 4 लाख 17 हजार 123 रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण 70 टक्के एवढे आहे. रविवारी 11 हजार 111 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या 1 लाख 58 हजार 395 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
दिल्ली
नवी दिल्ली- राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संपूर्ण देशभरात आम आदमी पक्षाकडून 30 हजार गावांमध्ये रक्तातील ऑक्सिजन प्रमाण तपासणी शिबीर घेणार असल्याचे जाहीर केले आहे. दिल्लीतल कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 52 हजार 580 वर पोहोचली आहे. दिवसभरात 652 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत दिल्लीत 4196 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी दिवसभरात 1310 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिल्लीतल कोरोनामुक्त होण्याचा दर 90.15 टक्के झाला आहे.
बिहार
पाटणा- बिहार राज्यात रविवारी 2 हजार 187 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. सध्या राज्यात 35 हजार 56 जणांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील कोरोना रुग्णसंख्येने 1 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. राज्याचे कामगार मंत्री विजय कुमार सिन्हा यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यासोबत 12 जणांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. वेगाने कोरोना रुग्ण वाढणाऱ्या राज्यांमध्ये बिहारचा समावेश झाला आहे. बिहारमध्ये रुग्णवाढीचा दर 4.32 टक्के झाला आहे. बिहारने रुग्णवाढीच्या दरात आंध्र प्रदेशला मागे टाकले आहे. आंध्र प्रदेशचा कोरोना रुग्णवाढीचा दर 3.8 टक्के झाला आहे.
झारखंड
रांची- राज्यात कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. झारखंड मधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 22 हजार 672 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 229 झाली आहे.
उत्तराखंड -
डेहराडून- रविवारी राज्यात एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. उत्तराखंडमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 152 झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12 हजार 175 झाली आहे. रविवारी 352 जणांना कोरोनामुक्त झाल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे. उत्तराखंडमध्ये आतापर्यंत 8 हजार 144 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 3 हजार 879 जणांवर उपचार सुरु आहेत.