तिरुवअनंतपुरम - कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी देशभरात खबरदारी घेतली जात आहे. कित्येक ठिकाणी लोक स्वतःहून नियमांचे पालन करत आहेत, तर काही ठिकाणी प्रशासनाकडून याबाबत सक्ती दाखवली जात आहे. आता केरळच्या वायनाड जिल्हा प्रशासनानेही लोकांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलली आहेत.
वायनाडमध्ये सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांना मास्क घालणे सक्तीचे करण्यात आले आहे. या आदेशाचे पालन न केल्यास तब्बल पाच हजारांचा दंड ठोठावला जाणार आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आर. इलांगो यांनी आज (बुधवार) हे जाहीर केले आहे.
यासोबतच सर्व किराणा आणि इतर अत्यावश्यक दुकानांमध्ये सॅनिटायझर किंवा साबण ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. एखाद्या दुकानात या सुविधा उपलब्ध नसल्यास, त्या दुकानदाराला एक हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येणार आहे.
वायनाड जिल्हा हा सध्या ग्रीन झोनमध्ये असून, जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. दरम्यान, जिल्ह्यातील ८४२ लोकांना घरांमध्ये निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तर, नऊ नागरिकांना रुग्णालयांच्या विशेष कक्षांमध्ये निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, वायनाड हा राहुल गांधींचा लोकसभा मतदारसंघ असून, मंगळवारीच त्यांनी जिल्ह्यातील लोकांशी संवाद साधला. लॉकडाऊन उठवण्यात आल्यानंतर त्वरीत आपण वायनाडला भेट देणार असल्याचेही त्यांनी लोकांना आश्वासन दिले.
हेही वाचा : दिल्लीतील भाजीमार्केटमधील ११ व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण