भुवनेश्वर - देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर ओडिशा राज्य सरकारने राज्यातील लॉकडाऊन येत्या 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. चालू लॉकडाऊन वाढवणारे ओडिसा हे पहिले राज्य ठरले आहे.
मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी 30 एप्रिलपर्यंत केंद्राला रेल्वे आणि हवाई सेवा सुरू न करण्याची विनंती केली आहे. ओडिशाच्या मंत्रिमंडळाने लॉकडाऊन मुदतवाढीचा निर्णय घेतला असून केंद्र सरकारलाही असे करण्याची शिफारस केली आहे.
मानवजातीला सर्वात मोठा धोका कोरोना विषाणूमुळे निर्माण झाला आहे. जीवन कधीही एकसारखे राहत नाही. आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे आणि एकत्रितपणे याचा सामना केला पाहिजे, असे पटनायक यांनी निवेदनात म्हटले आहे.
ओडिशामध्ये 42 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 2 जण कोरोनामधून बरे झाले आहेत. तसेच कोरोनामुळे राज्यातील 1 नागरिकाचा मृत्यू झाला आहे. भारतामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 540 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 5 हजार 734 झाली आहे. देशातील एकूण रुग्णांपैकी 5 हजार 95 रुग्ण हे अॅक्टिव आहेत. तर आतापर्यंत सुमारे 473 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. तसेच, देशात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या 17 नव्या बळींची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण बळींचा आकडा 166 वर पोहोचला आहे.