हैदराबाद : देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सोमवारी देशभरात ७८,५१२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यानंतर देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३६ लाख २१ हजार २४५ एवढी झाली आहे. यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड आणि ओडिशा या राज्यांमध्ये उच्चस्तरीय पथके पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर, पाहूयात कोरोना संबंधी देशभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी..
- नवी दिल्ली : दिल्ली सरकारकडे सध्या १० ते १५ दिवसांच्या चाचणीसाठी पुरेसे किट्स आहेत. मात्र, दिवसाला ४० हजार चाचण्यांचे लक्ष्य गाठण्याच्या उद्देशाने सरकार आणखी किट्स खरेदी करत आहे अशी माहिती आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली. यापूर्वीच दिल्ली सरकारने शहरातील प्रयोगशाळांची वेळ वाढवली आहे.
- मुंबई : महाराष्ट्र सरकारने 'अनलॉक 4' साठी नियमावली जाहीर केली असून यात ई-पासची अट रद्द करण्यात आली आहे. यामुळे आंतरराज्य प्रवास करण्यावरील बंधने शिथिल झाली आहेत. आता प्रवास करताना ई-पासची गरज नाही. याशिवाय खासगी तसेच मिनी बसेसना परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल आणि लॉज यांनाही पूर्णपणे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार असून खासगी कार्यालयात तीस टक्के उपस्थितीसह काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, एन्टरटेन्मेंट पार्क बंद राहणार आहेत. पण खासगी बस वाहतुकीला मात्र परवानगी देण्यात आली आहे. मोठ्या कार्यक्रमांच्या आयोजनावरील बंदी कायम असून लग्नासंबंधी कार्यक्रमांना 50 तर अंत्यसंस्कारांसाठी 20 व्यक्तींनाच परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्याच्या पाच जिल्ह्यांमध्ये मागील महिन्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांमध्ये ४०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बीड, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद आणि नागपूर हे ते पाच जिल्हे आहेत. तसेच, राज्यातील एकूण रुग्णांपैकी ५७ टक्के रुग्ण हे मुंबई, ठाणे आणि पुण्यातील असल्याचे समोर आले आहे.
- बंगळुरू : कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
- कोलकाता : पश्चिम बंगालच्या कन्टेन्मेंट झोन्समधील लॉकडाऊन ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य सचिव राजीन सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ७, ११ आणि १२ सप्टेंबरला पूर्णपणे लॉकडाऊन लागू असणार आहे.
- चेन्नई : तामिळनाडूमधील लॉकडाऊन ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र बरेच निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. या लॉकडाऊनच्या नियमावलीनुसार आंतरराज्यीय बस सुविधा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच, ७ सप्टेंबरपासून चेन्नई मेट्रोसेवा देखील सुरू करण्यात येणार आहे.
- भुवनेश्वर : ओडिशाचे उच्चशिक्षण मंत्री डॉ. अरुण कुमार साहू यांना कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी समोर आले. त्यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली.