हैदराबाद : गेल्या २४ तासांमध्ये देशात ६७,१५१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यानंतर देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३२ लाख ३४ हजार ४७४वर पोहोचली आहे. तसेच, काल दिवसभरात झालेल्या १,०५९ मृत्यूंनंतर देशातील एकूण कोरोना बळींची संख्या ५९ हजार ४४९ झाली आहे. आतापर्यंत एकूण २४ लाख ६७ हजार ७५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, ७,०७,२६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ७६.३० टक्के झाला असून, मृत्यूदर हा १.८४ टक्के आहे.
या पार्श्वभूमीवर पाहूयात कोरोनासंबंधीच्या देशभरातील विशेष घडामोडी..
- दिल्ली
नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्लीतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी शहरातील कोरोना चाचण्यांची संख्या दुप्पट करण्यावर आपण भर देणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच, दिल्लीतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्क्यांहून अधिक असल्याचेही त्यांनी सांगितले.
- पश्चिम बंगाल
कोलकाता : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी घोषणा केली, की देशातील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या सहा राज्यांदरम्यान होणारी पश्चिम बंगालची हवाई वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येत आहे. याचवेळी त्यांनी राज्यातील शैक्षणिक संस्था २० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचेही सांगितले. यासोबतच, ७,११ आणि १२ सप्टेंबरला पश्चिम बंगालमध्ये पूर्णपणे लॉकडाऊन लागू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, लवकरच राज्यातील मेट्रो सुरू होण्याचे संकेतही त्यांनी दिले.
- आसाम
गुवाहाटी : आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांना कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. आपल्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
- कर्नाटक
बंगळुरू : मैसूरचे पोलीस आयुक्त चंद्रगुप्त यांना कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारी समजले. गेल्या आठवड्यातच एका पोलीस अधीक्षकालाही कोरोनाची लागण झाली होती. तसेच, मैसूर पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर, उपायुक्त अभिराम शंकर हे स्व-विलगीकरणात गेले आहेत.
- तेलंगणा
हैदराबाद : जागतिअल जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक के. दक्षिणा मूर्ती यांचे बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. एका आठवड्यापूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यानंतर त्यांना करीमनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिनाअखेरीस ते सेवानिवृत्त होणार होते.
- पंजाब
चंदीगड : राज्याचे विधानसभा सत्र २८ ऑगस्टला सुरू होणार आहे. यापूर्वीच एकूण २३ मंत्री आणि आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी याबाबत माहिती दिली.
- ओडिशा
भुवनेश्वर : राज्याच्या पोलीस दलातील ५२ कोरोना योद्ध्यांनी आतापर्यंत आपला प्लाझ्मा दान केला आहे. अशा रितीने हे कोरोना योद्धे कोरोनाशी दुहेरी लढा देत आहेत. ओडिशाच्या पोलीस महासंचालकांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली. राज्यात बुधवारी ३,३४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले.