हैदराबाद - देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आता 17 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मागील चोवीस तासात देशात तब्बल 54 हजार 735 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर, तब्बल 853 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
भारतात मागील 24 तासात कोरोनाचे 54 हजार 735 नवीन बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यांसह देशातील एकूण रुग्णसंख्या 17 लाख 80 हजार 268 वर पोहोचली आहे. तर, 853 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या आता 37 हजार 364 झाली आहे. तसेच देशात सध्या कोरोनाचे 5 लाख 67 हजार 730 सक्रीय रुग्ण असून आजपर्यंत तब्बल 11 लाख 45 हजार 629 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
देशात अनलॉक-3 सुरू होत आहे. परंतु, मागील 4 दिवसांमध्ये देशात सुमारे 2 लाख कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, ही चिंतेची बाब आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्ली येथे रविवारी कोरोनाचे 961 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यासह दिल्लीतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 1 लाख 37 हजार 677 वर पोहोचली आहे. तसेच दिल्लीतील कोरोना मृतांची संख्या ही 4 हजार 4 इतकी आहे. रविवारी तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहितांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर चेन्नईतील अलवारपेट या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
देशातील अनेक राजकारणी देखील आता कोरोनाच्या विळख्यात सापडत असून रविवारी गृहमंत्री अमित शाहा यांसह कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
पाहूयात राज्यनिहाय कोरोनाचा आढावा...
महाराष्ट्र
- मुंबई - महाराष्ट्रात रविवारी 9 हजार 509 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 4 लाख 41 हजार 228 वर पोहोचली आहे. तर, 260 रुग्णाचा रविवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. यासोबत मृत कोरोना रुग्णांची संख्या 15 हजार 576 इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत 2 लाख 76 हजार 809 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 48 हजार 537 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.
पुणे जवळील चाकण एमआयडीसी येथील एका नामांकीत कंपनीतील 120 कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे औद्योगिक वसाहत परिसरात खळबळ उडाली आहे. कंपनी आणि परिसर कंन्टेमेंट झोन करण्यात येऊन आरोग्य विभागाने कंपनी परिसरात शनिवारी (दि. 1 ऑगस्ट) रोजी येथील पाहणी केली आहे.
हेही वाचा - CoronaVirus : राज्यात रविवार ९ हजार ५०९ नवे पॉझिटिव्ह, 260 रुग्णांचा मृत्यू
दिल्ली
- नवी दिल्ली - राष्ट्रीय राजधानी दिल्ली येथे रविवारी कोरोनाचे 961 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यासह दिल्लीतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 1 लाख 37 हजार 677 वर पोहोचली आहे. तसेच दिल्लीतील कोरोना मृतांची संख्या ही 4 हजार 4 इतकी आहे.
तमिळनाडू
- चेन्नई - तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना कोरोनाची लागण झाली आहे. राजभवनातील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर अलवारपेट या खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. कोरोनाची चाचणी केल्यानंतर कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. सध्या प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
मध्य प्रदेश
भोपाळ - मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ विभागात येणाऱ्या सर्व जिल्ह्यांमध्ये 'कोरोनाला मारा - 2' (किल कोरोना - 2) हे अभियान सुरू करण्यात आले आहे. हे अभियान 15 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. लोकांमध्ये कोरोनाबद्दल जनजागृती करणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यात लोकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे, फिजिकल डिस्टन्सिंग आदी गोष्टींबाबत जागृत करण्यात येणार आहे.
मध्य प्रदेश राज्यात यापुढे नवीन लॉकडाऊन लागू करण्यात येणार नसल्याते राज्य प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यांची तब्येत आता सुधारत असून ते रुग्णालयातून प्रशासकीय कामकाज करत आहेत.
ओडीशा
- कटक - राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्याचे उच्च न्यायालय आणि त्याच्या संबंधित सर्व कार्यालयाचे कामकाज पुढील उपाययोजना होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.