हैदराबाद - भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मागील 24 तासात देशात सर्वाधित 30 हजारांच्यावर कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. देशात कोरोनाबाधितांचा आतापर्यंतचा आकडा हा 9 लाख 68 हजार 876 इतका आहे. मागील 24 तासात 606 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या आता 24 हजार 915 इतकी झाली आहे.
- महाराष्ट्र
दिवसेंदिवस राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. अशातच आज एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात आज (शुक्रवार) कोरोनाचा उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक झाली आहे. आज ५ हजार ५२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६३ टक्के असून, आतापर्यत एकूण संख्या १ लाख ५८ हजार १४० रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, आज कोरोनाच्या ८ हजार ६४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, सध्या राज्यात १ लाख १४ हजार ६४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या १४ लाख ४६ हजार ३८६ नमुन्यांपैकी २ लाख ८४ हजार २८१ नमुने पॉझिटिव्ह (१९.६५टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख १० हजार ३९४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४२ हजार ८३३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- बिहार
राज्यात एम्सने कोवॅक्सीनसाठी मानवी चाचण्या करण्यास सुरुवात केली आहे. नालंदा मेडिकल कॉलेज व रुग्णालयात या मानवी चाचण्या करण्यात येणार आहेत. बिहारमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणीक वाढ होत आहे. यासाठी राज्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
- नवी दिल्ली
गुरुवारी नवी दिल्लीत कोरोनाचे 1 हजार 652 नवे रुग्ण सापडले आहेत. यासह राज्यात कोरोना संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 18 हजार पेक्षा जास्ती झाली आहे. राजधानीत कोरोनाने मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 3 हजार 545 इतकी झाली आहे.
- राजस्थान
राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यासाठी कोरोनाच्या टेस्ट वाढवण्याचा निर्णय राज्याच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. तसेच कोरोनातून बरे झालेल्या लोकांनी त्यांचा प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन आरोग्य मंत्री डॉ. शर्मा यांनी केले आहे.
- उत्तर प्रदेश
राज्यात गुरुवारी सर्वाधिक 2 हजार 61 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाबाधितांचा एकूण आकडा हा 43 हजार 444 इतका झाला आहे. गुरुवारी राज्यात 34 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, एकूण मृतांचा आकडा हा 1 हजार 46 वर पोहचला आहे.
हेही वाचा - मुंबईत कोरोनाचे 1 हजार 498 नवे रुग्ण; एकूण रुग्णसंख्या 97 हजार 751वर..
हेही वाचा - दिलासादायक! कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आलेल्या रुग्णांची संख्या अधिक...