हैदराबाद - कोरोना विषाणूने जगात थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. देशभरात शुक्रवारी सर्वाधिक 17 हजार 296 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 407 रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे देशभरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 90 हजार 401 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 15 हजार 301 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
![COVID-19 news from across the nation](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/7783036_p.jpg)
- दिल्ली -
दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांचा कोरोना चाचणी अहवाल शुक्रवारी निगेटिव्ह आला आहे. येथील एका खासगी कोविड सुविधा केंद्रामध्ये त्यांची प्लाझ्मा थेरपी करण्यात आली होती. सध्या राष्ट्रीय राजधानीत अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 26 हजार 586 वर पोहोचली आहे. तर 44 हजार 765 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 2 हजार 429 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
- गुजरात -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय पथकाने अहमदाबाद शहरातील विविध ठिकाणी जाऊन उपाययोजनांचा आढावा घेतला. सर्वात आधी पथकाने गोटा भागातील वसंतनगर येथे भेट दिली. यावेळी पथकाने मायक्रो-कंटेन्टमेंट झोन, आणि विषाणूवर मात करण्यासाठी अधिकाऱयांनी केलेल्या उपाययोजनांबद्दल माहिती संकलित केली.
पथकाने धन्वंतरी आरोग्य रथ या मोबाईल क्लिनिक व्हॅन्सचे परिक्षण केले. ती कशाप्रकारे काम करते हे जाणून घेतले. या महिन्याआधीच अहमदाबाद महानगरपालिकेने आरोग्य तपासणी आणि औषधींचे वाटप करण्यासाठी या व्हॅन्स लॉन्च केल्या आहेत.
- कर्नाटक -
सहायक पोलीस निरीक्षकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर बंगळुरु सेंट्रलचे पोलीस उपायुक्तांची सीट सील करण्यात आली आहे. तसेच पुढील तीन दिवसांसाठी कार्यालयदेखील सील करण्यात आले आहे. दरम्यान, मल्लेश्वरम वाहतूक पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर पोलीस ठाणे बंद करण्यात आले आहे.
- हरियाणा -
राज्यात बुधवारी 13 नवीन करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यासोबतच राज्यातील एकूण बाधितांची संख्या 12 हजार 463 वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार, 211 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 151 बाधित फक्त गुडगाव (81) आणि फरिदाबाद (70) येथील आहेत. दरम्यान, वाढत्या मृत्यूदरामुळे गुरुग्राम महानगरपालिकेने शॉपिंग मॉल्सला एसओपीचे पालन करण्यास मान्यता दिली आहे.
- झारखंड -
राज्यात बोकारो जिल्ह्यातील झोपडपट्टी भागात आणखी एका कोरोनाबाधिताची नोंद करण्यात आली आहे. सद्यस्थितीत याठिकाणी 9 कोरोनाबाधित आढळले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून जवळपास 200 जणांची नमुना चाचणी केली जात आहेत.
- बिहार -
राज्यात शुक्रवारी एकूण 123 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. यासोबतच राज्यातील एकूण बाधितांची संख्या 8 हजार 611 वर पोहोचली आहे. मात्र, राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर सकारात्मक आहे. आतापर्यंत 77.5 टक्के अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
- ओडिशा -
राज्यात आणखी 218 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या 7 जणांचा समावेश आहे. यासोबतच राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 6 हजार 180 झाली आहे.
- मध्यप्रदेश -
राजधानी भोपाळ येथे आतापर्यंत 2 हजार 683 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यात 50 नवीन बाधितांचा समावेश आहे. तर 94 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
- राजस्थान -
राज्यात शुक्रवारी 91 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. यासोबतच राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 16 हजार 387 वर पोहोचली आहे. दरम्यान, बिकानेरमधील 12 बँक कर्मचारी शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
- उत्तराखंड -
राज्यात शुक्रवारी 34 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यासोबतच राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 725 वर पोहोचली आहे.