हैदराबाद : रविवारी देशात एका दिवसातील सर्वाधिक म्हणजेच, ११,९२९ कोरोना रुग्ण आढळून आले, त्यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या ३,२०,९२२वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर पाहूया वेगवेगळ्या राज्यांमधील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी...
- नवी दिल्ली -
लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजाल यांनी रविवारी १००० बेड्सच्या मार्क-शिफ्ट रुग्णालयासाठी नियोजित जागेची पाहणी केली. दिल्ली-हरियाणा सीमेवरील राधा स्वामी सत्संग बीस या धार्मिक संस्थेच्या मैदानावर हे रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. यावेळी बैजाल यांच्यासह दक्षिण दिल्ली जिल्हा दंडाधिकारी बी. एम. मिश्राही होते.
- मध्य प्रदेश -
राज्याच्या राजधानीमध्ये आज ५४ नव्या रुग्णांची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर भोपाळमध्ये शनिवार आणि रविवारी पूर्णपणे लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. राज्यातील ५२ जिल्ह्यांपैकी ५१ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे.
- झारखंड -
राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, नगरपालिका निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आठ जागांवरील पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे निवडणुका घेण्यात येणार होत्या. आता या आठ ठिकाणी शहर आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. १८ जूनपासून ते कामकाज पाहतील.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सध्या १,७११ वर पोहोचली असून, ८८७ रुग्ण अॅक्टिव आहेत.
- बिहार -
रविवारी नोंद झालेल्या ६६ नव्या रुग्णांनंतर, राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ६,३५५वर पोहोचली आहे. तर आतापर्यंतर ३,६८६ लोकांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.
दरम्यान, राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बाहेरील राज्यातून परतलेल्या लोकांची रँडम तपासणी करून, सेरो-सर्वेक्षण घेण्यात येणार आहे. जेणेकरून कोरोनाच्या प्रसाराचा अंदाज येऊन त्यानुसार उपाययोजना करण्यात येतील.
- महाराष्ट्र -
पुण्यातील केईएम रुग्णालयामध्ये एका दोन महिन्याच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी घडली. तीन जूनला या बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर सात जूनला त्याचा मृत्यू झाला होता. त्याचा कोरोना अहवाल नंतर पॉझिटिव्ह आला.
देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य महाराष्ट्र आहे. राज्यात आतापर्यंत १,०४,५६८ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यानंतर तामिळनाडू (४२,६८७) आणि दिल्लीचा (३८,९५८) क्रमांक लागतो.
- गुजरात -
राज्य सरकारने जारी केलेल्या एका अधिसूचनेनुसार, मास्क न घातल्याबाबत लोकांकडून दंड वसूल करण्याचे काम आता स्थानिक प्रशासन न करता पोलीस करणार आहेत. राज्यात सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्याबद्दल २०० रुपये दंड आकारण्यात येत आहे.
- उत्तराखंड -
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात सॅनिटायझेशनचे काम सुरू आहे. यामध्ये लोकांवर सॅनिटायझर फवारण्याचाही समावेश आहे. मात्र, यामुळे लोकांच्या आरोग्याला हानी पोहचू शकते, असे मत विशेषज्ञांनी व्यक्त केले आहे. विशेषतः दम्याचा त्रास असणाऱ्या लोकांसाठी हा प्रकार घातक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
सॅनिटायझेशनसाठी वापरण्यात येणारे सोडियम हायपोक्लोराईट आणि हायड्रोजन पेरोक्साईड सारख्या रसायनांमुळे लोकांच्या आरोग्याला हानी पोहचू शकते. या रसायनांच्या थेट संपर्कात आल्यामुळे लोकांना त्वचेचे आजार, तसेच इतर आजार होण्याचा धोका असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
- राजस्थान -
राज्याच्या जोधपूरमध्ये व्यापारी संघटनेने जवळपास दीड हजार दुकानांना सॅनिटायझ करून घेतले. रविवारी व्यापारी पेठ सुरू झाल्यानंतर हे करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने दुकानदारांमार्फत दिलेल्या नियमांचे पालन होते आहे, की नाही याचा आढावा घेतला. यामध्ये सॅनिटायझेशन, फिजिकल डिस्टन्सिंग आणि मास्क अशा गोष्टींचा समावेश होता.