नवी दिल्ली : गेल्या २४ तासांमध्ये देशात तब्बल ९० हजार ६३३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंतची एका दिवसात नोंदवली गेलेली ही सर्वोच्च रुग्णसंख्या आहे. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४१ लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी याबाबत माहिती दिली.
यासोबतच, काल दिवसभरात एकूण १,०६५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या ७० हजार ६२६ झाली आहे. आतापर्यंत देशभरात ४१ लाख १३ हजार ८१२ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी ८ लाख ६२ हजार ३२० रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत ३१ लाख ८० हजार ८६६ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.
दरम्यान, काल दिवसभरात ७० हजार कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानुसार देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ७७.२३ टक्क्यांवर पोहोचला आहे. यासोबतच देशातील मृत्यूदरही कमी झाला असून, १.७३ टक्क्यांवर झाला आहे.