नवी दिल्ली - देशातील विविध राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत उच्चांकी वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 24 हजारांहून अधिक कोरोनाग्रस्त आढळल्याने चिंताग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. तर 613 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 7 लाखाच्या जवळ पोहचलाल आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 6 लाख 73 हजार 165 इतका झाला आहे. सध्या 2 लाख 44 हजार 814 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 4 लाख 9 हजार 83 लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर एकूण 19 हजार 268 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. यात महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये सर्वांत जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत.
दरम्यान गेल्या 24 तासांमध्ये 613 मृत्यूची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात 295, दिल्ली 81, तामिळनाडू 65 , कर्नाटक 42, उत्तर प्रदेश 24 , गुजरात 21, पश्चिम बंगाल 19, आंध्र प्रदेश 12 , बिहार 9 , जम्मू काश्मीर 8 , राजस्थान 7, हरियाणा, मध्य प्रदेश, ओडिशा, पंजाब, तेलंगाणामध्ये प्रत्येकी 5 तर गोवा आणि झारखंडमध्ये प्रत्येकी 2 आणि हिमाचल प्रदेशमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.