तिरुवअनंतपुरम - भारतीय विज्ञान संशोधन परिषदेने केरळला प्लाझ्मा थेरपी करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे एक पथक आता त्या दृष्टीने तयारी करत आहे. अशा प्रकारची थेरपी करण्याची परवानगी मिळणारे केरळ हे देशातील पहिलेच राज्य आहे. राज्य सरकारने यासाठी एका कृती दलाचीही स्थापना केली आहे.
काय असते प्लाझ्मा थेरपी..?
राज्य सरकारच्या कृती दलातील एक सदस्य अनुप कुमार यांनी याबाबत माहिती दिली. यामध्ये कोरोनाची लागण झालेला रुग्ण बरा झाल्यानंतर त्याच्या दोन चाचण्या घेतल्या जातात. त्याच्या दोनही चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर चौदा दिवसांनी पुन्हा एकदा त्याच्या रक्ताची तपासणी केली जाते. यावेळी त्याच्या रक्तामध्ये अँटीबॉडीजचे घटक (घातक विषाणूंना नष्ट करणारा रक्तातील घटक) शिल्लक आहेत का हे तपासले जाते.
जर या व्यक्तीच्या रक्तांमधील अँटीबॉडी या एका ठरावीक पातळीहून अधिक असतील, आणि या व्यक्तीचे वजन ५५ किलोंहून अधिक असेल, तर त्याच्या रक्तामधील ८०० मिलीलीटर प्लाझ्मा काढला जातो. हा प्लाझ्मा नंतर चार भागांमध्ये विभागला जातो. यामधील २०० मिलीलीटर प्लाझ्मा हा गंभीर रुग्णांवरती उपचार करण्यासाठी वापरला जातो, अशी माहिती कुमार यांनी दिली.
हा प्लाझ्मा कित्येक आठवड्यांपर्यंत साठवून ठेवता येतो. राज्यात सध्या ८० असे रुग्ण आहेत, जे उपचारांनंतर कोरोना निगेटिव्ह झाले आहेत, आणि अँटीबॉडी चाचणीसाठी तयार आहेत. त्यांच्या रक्तांची चाचणी तिरुवअनंतपुरममधील राजीव गांधी बायोटेक्नोलॉजी केंद्रावर होणार आहे. राज्यात सध्या कोरोनाच्या ३४५ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.
हेही वाचा : कर्नाटकातील १,३०० लोकांनी लावली होती मरकजला हजेरी; मुख्यमंत्र्यांची माहिती..