बंगळुरू - कोरोनाच्या विषाणूशी लढा देण्यासाठी इस्रोही पुढे सरसावले आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था आणि अवकाश विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार पंतप्रधान सहाय्य निधीमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंतप्रधान सहाय्य निधीमध्ये सुमारे पाच कोटी रुपयांची भर पडणार आहे.
इस्रोने घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देण्यात आली. कोरोनाच्या या आपत्तीला तोंड देण्यासाठी आपणही देशासोबत उभे आहोत, असे इस्रोने यावेळी सांगितले. यासोबतच इस्रोचे संशोधक वैद्यकीय साहित्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लवकरात लवकर कसे नेता येईल याबाबत संशोधन करत असल्याचेही त्यांनी सांगितले. जेणेकरून देशभरातील कोरोनाच्या रुग्णांवर वेळेवर उपचार शक्य होईल. तसेच, देशभरातील डॉक्टारांनाही आवश्यक ते सुरक्षेचे उपाय अवलंबता येतील.
देशात आतापर्यंत कोरोनाचे दोन हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तसेच ५३ जणांचा यात आतापर्यंत बळी गेला आहे. तसेच जगभरातील कोरोनाच्या रुग्णांनीही दहा लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तर, जगात ५० हजारांहून अधिक बळींची नोंद झाली आहे.
हेही वाचा : पोलिसाचा अनोखा उपक्रम, गाणे गात कोरोनाबाबत जनजागृती