नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. देशामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 979 वर पोहचला आहे. तर राज्यनिहाय आकडेवारी पाहता महाराष्ट्र आणि केरळमध्ये सर्वांत जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 979 झाली आहे. यामध्ये 931 भारतीय तर 48 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. तसेच यामुळे आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 87 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
महारष्ट्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 217 वर पोहचला आहे. तसेच केरळमध्ये 198 , कर्नाटकमध्ये 81, गुजरातमध्ये 57, दिल्लीमध्ये 47, तेलंगाणा 68 तर उत्तर प्रदेशमध्ये 66 अशी कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी आहे.
कोरोना महामारीने हजारो नागरिक जीवास मुकले आहेत. जगातील वेगवेगळ्या देशात कोरोना संक्रमणामुळे 30 हजार 892 लोकांचा मृत्यू झाला आहे. ग्लोबल कोविड-19 व्हायरसने जगभरातील 195 देश प्रभावित आहेत. चीनच्या वुहान प्रांतात प्रथम रुग्णांमध्ये या विषाणूची लक्षणे आढळली होती. येथूनच या विषाणूच्या प्रसारास सुरुवात झाली. जगभरात या प्राणघातक विषाणूचा प्रसार झाला आहे. आशियात भारत, पाकिस्तानसह अनेक देशांमध्ये तसेच, अमेरिका, युरोपातील इटली, फ्रान्स, जर्मनीसह अनेक देशांमध्ये कोरोनाचे संक्रमण झाले आहे.