नवी दिल्ली - जयपूर, दिल्ली आणि तेलंगणानंतर आता गुजरामध्येही कोरोनाचे संशयित आढळले आहेत. अहमदाबादमधील दोन महिलांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यामधील एका महिलेचे वय ६० वर्षे आहे. या दोघींनाही अहमदाबादच्या एसव्हीपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जगभरात थैमान घालणारा कोरोना हा भारतातही पोहोचला आहे. भारतात आतापर्यंत कोरोनाचे २९ रूग्ण आढळले आहेत. तसेच देशभरात ठिकठिकाणी संशयित रुग्ण आढळून येत आहेत. याआधी हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनीही राज्यात कोरोनाचे तीन संशयित रुग्ण आढळल्याचे राज्याच्या विधानसभेत सांगितले होते. तसेच, २१४ लोकांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, ओडिशाच्या संबलपूरमध्येही कोरोना विषाणूची लागण झालेला एक संशयित आढळून आला आहे. त्याला संबलपूरच्या बुर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, जयपूरमध्ये आढळलेल्या इटलीच्या २१ पर्यटकांना आणि तीन भारतीयांना बुधवारी विशेष कक्षांमध्ये हलवण्यात आले. इटलीच्या नागरिकांना गुरगावच्या एका खासगी रुग्णालयात, तर तीन भारतीयांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा : 'कोरोनाला सामोरे जाण्यासाठी सरकार कार्यरत; पंतप्रधान दररोज घेतायत आढावा..'