नवी दिल्ली - अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नितिशास्त्र समितीने शनिवारी स्वदेशी विकसित लस 'कोव्हॅक्सिन'ची मानवी क्लिनिकल चाचणी घेण्यास मान्यता दिली. ही चाचणी प्रकिया सोमवारपासून सुरू होणार असून रुग्णालय निरोगी व्यक्तींची नावनोंदणी सुरू करेल, असे एम्सच्या सेंटर फॉर कम्युनिटी मेडिसीनचे प्राध्यापक डॉ संजय राय यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
भारत बायोटेक निर्मित देशातील कोरोनाची पहिली लस 'कोव्हॅक्सिन'ची मानवी क्लिनिकल चाचणी सुरू करण्यास एम्स नीतिशास्त्र समितीकडून मान्यता मिळाली. आम्ही सोमवारपासून नोंदणी प्रक्रिया सुरू करणार असून निरोगी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 18 ते 55 वर्ष वय असलेल्या व्यक्तींवर ही चाचणी होईल. ही चाचणी यादृच्छिक, पूर्णपणे गोपनीय (डबल ब्लाइंड) आणि प्रायोगिक औषध नियंत्रित आहे.
जर एखाद्या स्वस्थ व्यक्तीला या प्रकियेचा भाग होण्याची इच्छा असले तर त्यांनी Ctaiims.covid19@gmail.com या ईमेलवर आपली माहिती पाठवावी. तसेच ते 7428847499 या क्रमांकावर संदेशही पाठवू शकतात. पहिल्या आणि दुसऱया टप्प्यासाठी 375 उमेदवारांपैकी 100 जणांची निवड केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
आम्ही या चाचणीसाठी आधीच काही स्वयंसेवकांची नोंदणी केली आहे. सोमवारपासून आमची टीम त्यांच्यावर चाचणी ट्रायल सुरू करण्यापूर्वी त्यांची आरोग्य तपासणी करेल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, मानवी चाचणी येत्या १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा आयसीएमआरचा मानस आहे. कोरोनासाठी जगभरात सध्या १४५ हून अधिक लसींची निर्मिती करण्यात येत आहे. यांपैकी केवळ २० लसींना मानवी चाचणी करण्याची परवानगी मिळाली आहे.