बंगळुरू - कोरोनाबाधित पत्रकाराच्या संपर्कात आल्यामुळे कर्नाटकातील पाच मंत्र्याची कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे. कन्नडा न्यूज चॅनलच्या व्हिडिओ जर्नलिस्टला कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पत्रकाराशी पाचही मंत्र्यांचा संपर्क आला होता. कर्नाटक राज्याचे मंत्री आणि कोव्हिड-१९ प्रवक्ते सुरेश कुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
पत्रकाराच्या सपंर्कात आलेले मंत्री विलगीकरणाचे नियम पाळत नसून आपले दैनंदिन काम करत असल्याची माहिती समोर येत आहे. कोरोनाबाधित पत्रकार कंन्टेनमेंट झोन असलेल्या परिसरात गेला होता. २४ एप्रिलला त्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
२१ ते २४ एप्रिलच्या दरम्यान हा पत्रकार कामानिमित्त मंत्र्यांना भेटला होता. मुख्यमंत्री बी. एस येडीयुरप्पा यांच्या कार्यालयातही पत्रकार गेला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांशी त्याची भेट झाली नव्हती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. २३ एप्रिलला या पत्रकाराचे वैद्यकीय नमुने घेण्यात आले होते. चाचणीत कोरोना झाल्याचे दुसऱ्या दिवशी स्पष्ट झाले. या पत्रकाराच्या संपर्कात आलेल्या इतर ४० जणांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. यामध्ये त्याच्या कुटुंबीयांचाही समावेश आहे.