रांची - शहरातील एका विधी विद्यालयातील तरुणीवर सामूहिक अत्याचाराची घटना नोव्हेंबरमध्ये घडली होती. याप्रकरणी निकाल जाहीर करत, न्यायालयाने सर्व आरोपींना कलम ३७६-ड अंतर्गत आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
२६ फेब्रुवारीलाच या प्रकरणातील आरोपींवरील गुन्हा सिद्ध झाला होता. भारतीय दंडविधानाच्या ३७६-ड, १२०-ब, ३६६, ३२३, ४११ आणि ३७९ या कलमांतर्गत या आरोपींवर गुन्हा सिद्ध झाला होता. आज त्यांना शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणात एकूण १२ आरोपींवर खटला सुरू होता, यातील एका आरोपीला अल्पवयीन घोषित करण्यात आले आहे. तर, उरलेल्या ११ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुनावणीदरम्यान हे आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर होते.
आरोपींची नावे पुढीलप्रमाणे..
- कुलदीप उरांव
- सुनील उरांव
- संदीप तिर्की
- अजय मुंडा
- राजन उरांव
- नवीन उरांव
- बसंत कच्छप
- रवि उरांव
- रोहित उरांव
- सुनील मुंडा
- ऋषि उरांव
काय होते प्रकरण..?
२६ नोव्हेंबर २०१९ला रांचीमधील विधी महाविद्यालयात शिकणारी एक तरुणी, आपल्या मित्रासह संग्रामपूर बसस्थानकावर बसली होती. यावेळी, दुचाकी आणि चारचाकीमध्ये आलेल्या काही तरुणांनी तिचे अपहरण करत तिला जवळच्या एका वीटभट्टीमध्ये नेले. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार करत, पुन्हा तिला बसस्थानकावर सोडून आरोपी फरार झाले. दुसऱ्या दिवशी पीडित तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार तपास करत पोलिसांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक केली. त्यानंतर ९२ दिवसांमध्ये याप्रकरणी सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली आहे.
हेही वाचा : निर्भया प्रकरण : आरोपींची फाशी चौथ्यांदा पुढे ढकलली, दिल्लीतील न्यायालयाचा निर्णय..