नवी दिल्ली - कोरोनावर उपचार सापडल्याचा खोटा दावा करून लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी पतंजली आयुर्वेद लिमिटेड, रामदेव बाबा आणि इतरांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची याचिका पटियाला हाऊस न्यायालयात दाखल झाली आहे. याचिकेवरून न्यायालयाने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली असून 15 जुलैपर्यंत अॅक्शन टेकन रिपोर्ट दाखल करण्यास सांगितले आहे.
रामदेव बाबा व इतरांवर गुन्हा नोंदवण्याबाबत वकील तुषार आनंद यांनी दाखल केलेल्या अर्जावर महानगर दंडाधिकारी सुमित आनंद यांनी सुनावणी केली. दिल्लीतील वसंत विहार पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. न्यायालयाकडून 15 जुलैपर्यंत कारवाईचा अहवाल मागविण्यात आला आहे. याचिकाकर्त्याने आयपीसीच्या 270, 420 आणि 504 कलमांखाली एफआयआर दाखल करण्यास सांगितले.
बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं गेल्या आठवड्यात कोरोनावर औषध शोधल्याचा दावा केला. कोरोनिल नावाचे औषध पतंजलीनं लॉन्च केले. या औषधाने कोरोना बरा होतो असं म्हणत याची जाहिरातही करण्यात आली. मात्र, ज्यानंतर आयुष मंत्रालयाने या संदर्भात पतंजलीला नोटीस धाडली. या नोटिशीनंतर यू टर्न घेत पतंजलीने आपण असा काही दावा केलाच नाही असं स्पष्ट केलं.