नवी दिल्ली - सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात आरोपी असलेले काँग्रेस खासदार शशी थरुर यांना दिल्ली न्यायालयाने विदेशात जाण्यासाठी परवानगी दिली आहे. शशी थरुर यांनी ऑगस्ट ५ ते ऑक्टोबर २ या कालावधीत विदेशातील कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठी परवानगी मागितली होती.
विशेष न्यायाधीश अरुण भारद्वाज यांनी शशी थरुर यांच्या याचिकेवर सुनावणी केली. न्यायाधीशांनी थरुर यांना अमेरिका, कॅनडा, जर्मनी, मालदीव, दक्षिण कोरिआ आणि इंग्लंडला जाण्याची परवानगी दिली आहे. यामुळे थरुर यांना कोणत्याही परवानगीशिवाय देशाबाहेर जाता येणार आहे.
सुनंदा पुष्कर यांचा १७ जानेवारी २०१४ साली हॉटेलमध्ये संशयितरित्या मृतदेह सापडला होता. सरकारी बंगल्याचे नुतनीकरण चालू असल्याने सुनंदा पुष्कर आणि शशी थरुर दोघे हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री असलेल्या शशी थरुर यांच्यावर भारतीय दंड संहिता ४९८-ए आणि ३०६ नुसार गुन्हा दाखल आहे.