नवी दिल्ली - पूर्ण सेवा एअरलाइन्स विस्ताराच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवेमध्ये बदल करण्यात येणार आहेत. विमान सेवेमध्ये मानवी संपर्क, स्पर्श 80 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात येणार आहे. विस्तारा विमान सेवेच्या देशांतर्गत उड्डाणामध्ये जेवणाची निवड, ऑन बोर्ड विक्री, वेलकम ड्रिंक, गरम जेवण आणि पेय पदार्थ हे इकॉनॉमी आणि प्रीमियम केबिनमध्ये देण्यात येणार नाहीत. स्टारबक्स कॉफी आणि टॉवेल्स व्यावसायिक वर्ग आणि प्रीमियम इकॉनामी क्लासमध्ये दिले जाणार नाहीत. 200 मिली सीलबंद पाण्याच्या बाटल्यांनी पाणी ओतणेदेखील बदलले जाईल, असे विमान कंपनीने निवेदनात म्हटले आहे.
ग्राहकांशी संपर्क कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील सेवांचा त्यादृष्टीने आढावा घेण्यात येईल, असे विस्ताराने सांगितले. एअरलाअन्स केबिन क्रूला कोरोना विषाणूचा प्रसार कमी करण्याबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. उड्डाणे सोडण्यापूर्वी आणि उड्डाणे येण्यापूर्वी थर्मल स्क्रिनिंग केले जाणार आहे. कोणत्याही सहकाऱ्याला किंवा प्रवाशाला कोरोनाची लक्षणे आढळल्यास किंवा चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांची तपासणी केली जाईल. केबिन क्रुला वैयक्तिक संरक्षक उपकरणे दिली जातील, असेही त्या निवेदनात म्हटले आहे. स्पर्शाने विषाणूचा फैलाव होण्याचा धोका कमी करण्यासाठी, फ्लाइट मासिके आणि इतर वाचन साहित्य दिले जाणार नाही, अशी माहिती ही एअरलाईन्सने दिली आहे.