बिजिंग - चीनमध्ये उगम झालेल्या कोरोना विषाणूमुळे जगभरात आत्तापर्यंत ४ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तब्बल १०४ देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर चीनबाहेर २८ हजार ६०० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. भारतातही ४७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे.
चीनमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात दररोज १०० ते १५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत होता. मात्र, आता कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. काल(सोमवारी) चीनमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला. चीननंतर सर्वात जास्त प्रसार इटली देशात झाला आहे. इटलीत ९ हजार पेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर मृतांचा आकडा ५०० पर्यंत पोहचला आहे. इटलीनंतर इराणमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत.
जगभर कोरोनाचा वाढता प्रभाव पाहून अनेक देशांनी प्रवासी वाहतूकीवर निर्बंध लागू केले आहेत. भारतानेही ज्या देशांमध्ये कोरोनाचा जास्त संसर्ग झाला आहे, त्या देशातील नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात व्हिजा देणे बंद केले आहे. म्यानमार सीमा बंद करण्यात आली आहे. तसेच इतर सीमावंर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भारतात जवळ जवळ ३० हजार जणांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. प्रत्येक विमानतळावर परदेशातून आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. केंद्र सरकारने आणि सर्वच राज्य सरकारने नागरिकांना आरोग्याची काळजी आवाहन केले आहे, तसेच सार्वजनिक कार्यक्रमाला जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.
कोव्हिड १९ या आजाराने चीनबाहेर २८ हजार ६०० जणांना लागण झाली आहे. तर १०४ देशांमध्ये कोरोना पसरला आहे. चीनबाहेर ६८६ जणांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. कोरोनाच्या साथीमुळे जागतिक स्तरावर व्यापारही मंदावला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोरोनामुळे परिणाम दिसून येत आहे.