नवी दिल्ली - भारतातील कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस लक्षणीय वाढ असून परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा दीड लाखाच्या पुढे गेला आहे. गेल्या 24 तासांमध्ये भारतामध्ये 6 हजार 566 कोरोनाबाधित आढळले असून 194 जण कोरोनाचे बळी गेले आहेत.
देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 58 हजार 33 झाला आहे, यात 86 हजार 110 अॅक्टिव्ह केस आहेत. तसेच 67 हजार 692 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तर 4 हजार 531 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
महाराष्ट्रामध्ये 56 हजार 948 कोरोनाबाधित असून 1 हजार 897 जणांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये 18 हजार 545 कोरोनाबाधित तर 133 जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. गुजरातमध्ये 15 हजार 195 कोरोनाबाधित असून 938 जणांचा मृत्यू झाला आहे. या पाठोपाठ दिल्लीमध्ये 15 हजार 257 कोरोनाबाधित तर 303 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना विरुद्धच्या लढाईत आणखी एक पाऊल पुढे टाकत भारत एका दिवसामध्ये तब्बल 1 लाख कोरोना चाचण्या करत आहे. या चाचण्या 612 प्रयोगशाळेत करण्यात येत आहेत. आज संपूर्ण भारतामध्ये एकूण 612 प्रयोगशाळा आहेत. यामध्ये 430 सार्वजनिक तर 182 खासगी प्रयोगशाळा आहेत. तसेच जगाच्या तुलनेत भारताचे मृत्यूचे प्रमाण कमी असून रुग्ण बरे होण्याचा दरही चांगला आहे.