हैदराबाद- सध्याच्या दिवसात जिकडे पाहावे तिकडे, जणू हवेतही कोरोना आणि त्याविषयीचेच बोलणे सुरू आहे. नाही, आम्ही हे फक्त बोलण्यासाठी बोलले जाते, असे म्हणत नाही. कारण आता हे सिद्ध झाले आहे की कोरोना हा हवेतूनही पसरू शकतो. शास्त्रज्ञांनी घोषित केले आहे की, सार्स सीओव्ही २ विषाणूचा संसर्ग निरोगी व्यक्तीला होऊ शकतो.
कोरोना रुग्णाच्या तोंडातून बाहेर उडालेला अती सूक्ष्म थेंब हवेतून जाऊन निरोगी व्यक्तीला संसर्ग करू शकतो आणि म्हणूनच जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे की, लोकांनी याबाबत जास्त काळजी घ्यायला हवी. हे सांगितल्यानंतर नागरिकांमध्ये जास्तच घबराट उडाली. त्यात दररोज देशात कोरोना संसर्गाची संख्या वाढतच आहे. हवेतून कोरोना संसर्ग म्हणजे काय? आणि ते कसे टाळायचे?
कोरोना विषाणू हा थोडा आकाराने मोठा आहे आणि ५ मायक्रॉन्सपेक्षा मोठ्या थेंबातून तो पसरतो. असे आपण आतापर्यंत समजत होतो. म्हणूनच लोक एकमेकांपासून अंतर राखून काळजी घेत असतात. पण नुकत्याच झालेल्या खुलाशानुसार तुमच्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तीच्या श्वाच्छोश्वासामधून हा विषाणू पसरतो हे समोर आले आहे आणि ती व्यक्ती अंतर ठेवून तुमच्याशी बोलली, तरीही संसर्ग होऊ शकतो. यामुळे लोकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
शक्यतो आपल्या लाळेचे मोठे थेंब हे जड असतात. त्यामुळे जमिनीवर गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली लगेच पडतात. ते दोन मीटर अंतरापेक्षा जास्त जाण्याची क्षमता त्यांच्यात नसते. पण ५ मायक्रोन्सपेक्षा लहान आकार असलेला लाळेचा थेंब हा हलका असतो आणि तो हवेत बराच काळ तरंगत राहतो. अशा तरंगत असलेल्या थेंबाच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांनी श्वास घेतला तर मग त्यांना संसर्ग होण्याचा धोका असतो. अशा प्रकारे हवेतून संसर्ग होऊ शकतो. आणि अशा संसर्गाबद्दलच सध्या प्रचंड काळजी आहे. याचे कारण शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की, कोरोना विषाणू हा थेंबातून पसरू शकतो आणि तो संसर्गजन्य असू शकतो.
गर्दीच्या ठिकाणी लोक संसर्ग झालेल्यांबरोबर जास्त काळ राहिले तर निरोगी व्यक्तीला कोरोना व्हायची शक्यता जास्त आहे. कारण हा विषाणू हवेतून पसरू शकतो. आणि जागतिक आरोग्य संघटनेने या म्हणण्याला दुजोरा दिला आहे, म्हणूनच लोकांमध्ये काळजी जास्त वाढली आहे. खरे तर अती सूक्ष्म थेंबातून कोरोना पसरतो, हे काही नवे नाही. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले होते की, कोरोना रुग्ण उपचार घेत असतो, तेव्हा त्याची श्वाच्छोश्वासाची नलिका बदलली जाते किंवा ती नाकात घातली जाते तेव्हा रुग्णाच्या श्वासातून थेंब पसरून विषाणूच्या संसर्गाचा फैलाव होण्याचा धोका जास्त असतो. पण आता हे फक्त रुग्णालयांपुरते मर्यादित राहिलेले नाही. नव्या खुलाशामुळे आता घरे, इमारती आणि कार्यालये इथे हवेचा झोत फार चांगला नसेल किंवा ठिकाण हवेशीर नसेल तर हा धोका वाढतो. चीन आणि अमेरिका इथे काही लोकांना कोरोना रुग्णांच्या संपर्कात न येताही कोरोना झाला. याचा अर्थ फक्त कोरोना रुग्ण शिंकला किंवा खोकला तरच हा विषाणू दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो,असे अजिबात नाही. कोरोनाचे हवेत तरंगणारे थेंब हे ६ ते ९ फुटापर्यंत जाऊ शकतात. ते आजूबाजूच्या वस्तूंना जाऊन चिकटू शकतात. जर एखाद्याने अति सूक्ष्म थेंब असलेल्या ठिकाणी श्वास घेतला, त्यांनी तिथल्या वस्तूंना लावलेला हात नाक, डोळे आणि तोंडाला लावला तर विषाणू त्या व्यक्तीमध्ये जाऊ शकतो. तरीही यामुळे किती संसर्ग होऊ शकतो, हे नक्की माहीत नसले, तरी सावधगिरी बाळगणे खूप महत्त्वाचे आहे.
हवा विषाणू पसरवण्यापासून थांबवू शकते
असे म्हणतात, काटा हा काट्याने काढला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे हवेतून लोकांना संसर्ग पोचवणाऱ्या कोरोना विषाणूपासून मुक्तता मिळवण्यासाठीच हवेचाच उपयोग करता येऊ शकतो. त्यासाठी मोकळी हवा हवी आणि घरे, इमारती आणि कार्यालये ही हवेशीर हवीत. जेव्हा घराबाहेर जायची गरज पडेल, तेव्हा मास्क लावूनच जायला हवे, हात वारंवार धुवायला हवेत. अर्थात, एवढेच पुरेसे नाही. इमारतीत हवा मोकळी वाहते आहे, जागा हवेशीर आहे, याची खात्री करायला हवी. दारे आणि खिडक्या हवा येण्यासाठी उघड्या ठेवायला हव्यात. एक्झाॅस्ट पंख्याचा वापर करायला हवा. म्हणजे विषाणू असेलच तर तो हवेबरोबर बाहेर निघून जाईल. जे ठिकाण चांगले हवेशीर असते, जिथे सूर्यप्रकाश आणि ताजी हवा असते, तिथे कोरोना विषाणू जिवंत राहू शकत नाही. बरेच लोक एकत्र जमत नाहीत ना, याचीही काळजी घ्यायला हवी. लिफ्ट्सचा वापर टाळा. लिफ्ट वापरतच असाल तर वापरताना एक्झाॅस्ट पंखा लावा.
श्वास घेताना घ्यायची काळजी
महत्त्वाचे म्हणजे दुसऱ्याने सोडलेला उश्वास कुणीही घेऊ नये. यासाठी मास्क खूपच महत्त्वाचा आहे. अशा वेळी आळशीपणा करू नका. अनेक लोकांना कोरोनाचा संसर्ग असला तरी लक्षणे दिसत नाहीत. असे असिम्टमॅटिक लोक सारखेच किंबहुना जरा जास्तच धोकादायक असतात. म्हणूनच प्रत्येक व्यक्ती संक्रमित आहे, असा पद्धतीने त्यांच्याकडे पाहा. प्रत्येकानेच दर वेळी मास्क लावला पाहिजे. प्रत्येकाने फक्त ऑफिसमध्येच नाही, तर घरीही मास्क घालायची सवय लावली पाहिजे. असे समजू नका की मास्क घालणे काही महत्त्वाचे नाही. मास्क नीट आणि प्रामाणिकपणे वापरणे हे आपले कर्तव्य समजावे. छोटा मास्क वापरू नका. नाक, तोंड आणि गळ्याचा खालचा भाग झाकला जाईल, असा मास्क वापरावा, मास्क हा चांगल्या प्रतीचा हवा, कापडाचा मास्क हा चांगला असतो, पण कोरोना रुग्ण जवळपास असताना या मास्कमुळे मिळणारे संरक्षण पुरेसे नाही.
सर्जिकल मास्क हा रुग्णालयात जाताना किंवा कोरोना रुग्णांची सेवा करताना घालणे अत्यावश्यक आहे. या सर्जिकल मास्कना तीन थर असतात. बाहेरचा थर हा हवेतली आद्रता आणि धूळ शोषून घेतो. मधला थर हा हवा शुद्ध करतो आणि विषाणूंपासून रक्षण करतो. अगदी आतला आणि तिसरा थर हा घाम आणि आद्रता शोषून घेऊन आपल्याला आराम देतो.
जवळजवळ ९० टक्के लोक नेहमी त्यांचे मास्क चेहऱ्यावरून काढतात. ही काही चांगली सवय नाही. कुठल्याही परिस्थितीत मास्कच्या पुढच्या भागाला हात लावू नका. तळहातावर विषाणू आणि जिवाणू असे बरेच सूक्ष्म जंतू असतात. मास्कला हात लावला तर ते मास्कला चिकटू शकतात. तळहाताने डोळे आणि नाकाला हात लावला किंवा ते चोळले तर विषाणू शरीरात प्रवेश करतात. हात लावलेल्या वस्तूंवर विषाणू संक्रमित होतात. त्यामुळे हात तोंडाला लावल्याने चांगल्यापेक्षा ते जास्त धोकादायक आहे. कपड्याचा मास्क रोज स्वच्छ साबणाने धुवायला हवा. हा मास्क सूर्यप्रकाशात सुकवण्याआधी ब्लीचिंग पावडरच्या पाण्यात भिजवून ठेवायला हवा अशी माहिती कन्सल्टंट फिजिशियन यशोदा हाॅस्पिटल सोमाजीगुडा, हैद्राबाद येथील डाॅ. एम. व्ही. राव यांनी दिली.