चंदीगड : हरियाणाच्या गुरुग्राममध्ये एका बारावीत शिकणाऱ्या मुलाने आत्महत्या केली आहे. मंगळवारी रात्री आपल्या घराच्या बाल्कनीमधून खाली उडी मारत त्याने आत्महत्या केली. सोशल मीडियावर गाजत असलेल्या 'बॉईज लॉकर रुम' प्रकरणाशी या मुलाचा संबंध असल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे, त्यानुसार त्यांनी चौकशी सुरू केली आहे.
गुरुग्राममधील डीएलएफ कार्लटन एस्टेटमध्ये एका इमारतीत हा मुलगा राहत होता. इमारतीच्या ११व्या मजल्यावर असलेल्या आपल्या घराच्या बाल्कनीमधून मंगळवारी रात्री ११च्या सुमारास त्याने आत्महत्या केली. पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त करत तो फॉरेन्सिक लॅबला पाठवला आहे. तसेच, आम्ही सायबर सेलच्या मदतीने याबाबत तपास करत आहोत, अशी माहिती सेक्टर ५३ पोलीस ठाण्याचे एसएचओ दीपक कुमार यांनी दिली आहे.
या मुलाने आत्महत्या करण्यापूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवली नाही. त्याचा स्वभाव कसा होता, आणि त्याने एवढे टोकाचे पाऊल का उचलले याची माहिती घेण्यासाठी आम्ही त्याचा मोबाईल तपासणार आहोत, अशी माहितीही पोलिसांनी दिली.
हेही वाचा : 'बॉय्ज लॉकर रुम' कांड : एक ताब्यात, २२ जणांची ओळख पटवण्यात यश..