नवी दिल्ली - निवडणुका अर्ध्याहून अधिक संपल्या आहेत. यातून स्पष्ट होत आहे की, नरेंद्र मोदी ही लोकसभा निवडणूक हरणार आहेत आणि पराभव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. 'भाजप लोकसभा निवडणुकीत हरवण्यासाठीच आम्ही मैदानात उतरलो आहोत. आमचे सर्वच राज्यात चांगले कार्य आहे, आणि आम्ही भाजपला हरवणार आहोत. असे म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या कारभारावर जोरदार टीकास्त्र सोडले.
लष्कर ही त्यांची वैयक्तीक मालमत्ता नाही, ती भारत देशाची मालमत्ता आहे. त्यामुळे सर्जिकल स्ट्राईकचे यश हे लष्कारांचे यश आहे, मोदींनी ते स्वत:चे समजू नये असा टोला त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी राफेल, नोटाबंदी आणि जाहीरनाम्यावरून जोरदार निशाणा साधला.
राहुल म्हणाले, मोदी सरकारने शेतकरी, रोजगार, युवकांसाठी काय केले, बेरोजगारी सर्वात मोठा विषय आहे. मात्र त्यासाठी मोदींनी काय केले ते सांगावे. काँग्रेसचा जाहीरनामा शेतकरी, युवक, गरीब आणि महिलांचे हित समोर ठेवूनच न्याय देणारा असल्याचे ते म्हणाले.
भारतीय सैन्य दलावरून त्यांनी मोदींवर निशाणा साधला. भारताचे सैन्य ६० वर्षापासून पराक्रम गाजवत आहे. मग ते पंतप्रधान मोदी त्यांचे भांडवल का करत आहेत. ती त्यांची वैयक्तीक मालमत्ता असल्याचे ते समजत असल्याचे ते म्हणाले. तसेच राफेलमध्ये चौकीदारने ३० हजार कोटींचा घोटाळा केला. त्यामुळे चौकेदार चोर हे सत्य असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. राफेल कंत्राटाचे प्रकरण समजून घ्या, या व्यवहारात पीएमओचा हस्तक्षेप का आहे. हे समजून घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच मी मोदींसोबत चर्चा करायला तयार आहे ते कुठे सांगतील त्या ठिकाणी मी येईन, केवळ अंबानीचे घर सोडून असा निशाणाही त्यांनी अंबानीवर साधला.
न्याय योजना देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. लाखो गरिबांना त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक विकासालाही चालना मिळणार आहे. गरिबीवर वार ७२ हजार म्हणत नोटबंदीत झालेले नुकसान न्याय योजनेमुळे भरून निघेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
देश संकटात आहे, युवक बेरोजगार होत आहे, शेतकरी उद्धवस्त होत आहे. आम्ही त्यांच्याशी चर्चा करून त्यांना बळ देण्या्चा प्रयत्न करत आहोत. मात्र पंतप्रधान मोदी या एकाही मुद्यांवर बोलायला तयार नाहीत. त्यांनी समोरा समोर येऊन चर्चा करावी असे आव्हानही राहुल गांधींनी यावेळी मोदींना दिले. मात्र, मोदींवर कोणत्या गोष्टीचा दबाब वाढला की ते पळ काढतात, तो त्यांचा स्वभाव झाला असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
भारताच्या संस्थावर होणारे हल्ले मला थांबावयचे आहे. सर्वजन म्हणत होते. मोदींना हरवणे अशक्य आहे. मात्र येत्या १० ते १५ दिवसात शक्य झालेले तुम्हाला दिसले, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले,
तसेच चौकीदार चोर है असे जनताच म्हणत आहे, एवढेच काय आज माध्यमचं आमच्या कानात येऊन चौकीदार चोर असल्याचे सांगत आहेत असेही ते म्हणाले.
मसूद हा दहशतवादी आहे. मात्र त्याला तिथे पाठवले कोण ? त्याला काय काँग्रेसने पाठवले नाही. त्यामुळे भाजप तडजोडी करत आहे. आणि काँग्रेस असा प्रकार कधी करणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मोदी सरकार भारतातील संस्थावर दबाब आणत आहे. त्या प्रमाणे निवडणूक आयोगावर दबाब आणला जात आहे. मात्र आता जनताच निर्णय घेणार आहे. तरीही निवडणूक आयोगाने योग्यरित्या काम करावे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. शेवटी जाताजाता त्यांना पंतप्रधानांनाही एखादी पत्रकार परिषद घ्यायाला सांगा, असे आव्हान माध्ममांना केले.