मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात वंचित बहुजन आघाडीला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांच्या महाआघाडीत सामील करण्यासाठी आज पहिले सकारात्मक पाऊल पडले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे अशोक सोनावणे, लक्ष्मण माने आदी नेत्यांसोबत आज मुंबईत विरोधीपक्ष नेत्यांच्या बंगल्यावर बैठक झाली.
या बैठकीत वंचित बहुजन आघाडीकडून जे जे काही विषय आणि प्रस्ताव समोर आणले, त्यावर आम्ही चर्चा करत आहोत. अद्यापही आम्ही अंतिम निर्णय घेतला नाही. विस्तृत आणि सकारात्मक चर्चा झाली. दोन्ही बाजूंनी चर्चा झाली असली तरी कशा पद्धतीने पुढे जायचे यावर निर्णय होऊ शकला नसल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली. राज्यातील जागा वाटपांसाठी प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका अगोदरच स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे तो प्रश्न आमच्यासाठी आता महत्वाचा राहिलेला नाही. राहिला प्रश्न संघाच्या बाबतीत, तर आमची संघाच्या विरोधातच भूमिका आहे. त्यांच्या विचारांच्या विरोधात काँग्रेसची भूमिका राहिलेली असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांनी वेळोवेळी याविषयी ते स्पष्ट ही केलेले आहे. हा विषय आता महत्वाचा असला तरी आमची भूमिका स्पष्ट आहे. संघाला घटनात्मक चौकटीत आणण्यासाठी चर्चा सकारात्मक झाली आहे. त्यात एकवाक्यता आहे. आमची चर्चा संपूर्ण झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर आणि राहुल गांधी या दोन्हीही राष्ट्रीय नेत्यांची चर्चा घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे त्यांची बैठक होईलच. दोन्ही नेत्यांनी शिक्कामोर्तब करावा, अशी आमची इच्छा असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.
आम्हाला आता 22 जागा हव्यात - माने
वंचित बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने म्हणाले, की आम्ही संघाच्या मसुद्याबद्दल चर्चा केली आहे. त्यासोबतच जागेसाठीही आमची चर्चा झाली आहे. त्यावर निर्णय झालेला नाही. परंतु, आम्ही आत्तापर्यंत २२ जागा जाहीर केलेल्या असल्याने आमच्या दृष्टीने अडचणीचा विषय आहे. तरीही राहुल गांधी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीतून काय मार्ग निघायचा तो निघेल. जागा वाटपाचा प्रश्न आल्याने सगळ्याच गोष्टीवर अडत आहे. चर्चेतून तो प्रश्न सोडवला पाहिजे. नेते जे निर्णय घेतील तो अंतिम राहिल. आम्ही ज्या जागा २२ जागा जाहीर केल्या आहेत. त्या आम्हाला त्यांनी द्याव्यात, अशी आमची मागणी आहे. आम्ही काँग्रेसला ३० तारखेपर्यंत अल्टीमेटम दिला होता. आता जागा हा प्रश्न महत्वाचा नसला तरी लवकर प्रश्न सुटण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे माने म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी याविषयी प्रकाश आंबेडकर यांना विनंती करत लवकरात लवकरच आघाडीत येऊन देशातील मोदी सरकारला सत्तेतून खेचून काढावे, असे आवाहन केले.