हैदराबाद - तेलंगणा येथील काँग्रेस पक्षातील १२ आमदारांनी आज विधानसभा सभापती पोचाराम श्रीनिवास रेड्डी यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये आमदारांनी काँग्रेस पक्ष विद्यमान सत्ताधारी पक्ष तेलंगणा राष्ट्र समितीमध्ये विलीन करण्याचे पत्र सभापतींना दिले आहे. त्यामुळे तेलंगणा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) पक्षाने चांगली कामगिरी करताना ११९ पैकी ८८ जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केली होती. तर, काँग्रेस पक्षाने १९ जागांवर विजय मिळवला होता. यापैकी १ आमदार लोकसभा निवडणूक जिंकल्यामुळे त्यांनी सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या १८ आमदारांपैकी आता १२ आमदारांनी सभापतींची भेट घेत पक्ष विद्यमान सत्ताधारी पक्षात विलीन करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे, काँग्रेसकडे सध्या फक्त ६ आमदार आहेत.