ग्वालियर - येथे भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याबद्दल बेपत्ता असल्याचे पोस्टर छापून चिकटवणाऱ्या एका काँग्रेस नेत्याला अटक करण्यात आली आहे. त्याने जनसेवक ज्योतिरादित्य सिंधिया हरविले असून शोधून देणाऱ्यास ५ हजार १०० रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, अशा आशयाचे एक पोस्टर छापले होते. इतकेच नव्हे तर, त्याने हे पोस्टर ग्वालियर येथील जय विलास पॅलेसच्या गेटवर चिकटवले होते.
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काही काळापूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपशी हात मिळवणी केली होती. त्यांच्या राजीनाम्या नंतर मध्य प्रदेशातील कमलनाथ यांचे सरकार कोसळून परत, शिवराज सिंह चौहान यांची सत्ता आली. यानंतर मध्य प्रदेशमध्ये या ना त्या कारणावरुन राजकीय वाद उसळत आहेत. यातच रविवारी काँग्रेसचे नेते सिद्धार्थ सिंह राजावत यांनी ग्वालियरच्या जय विलास पॅलेसच्या गेटवर ज्योतिरादित्य सिंधिया हे हरविले आहेत अशा आशयाचे पोस्टर चिकटवणे सुरू केले. या पोस्टरमध्ये हरवलेल्या जनसेवकास शोधून देणाऱ्या ५ हजार १०० रुपयांचे नगद पारितोषिक देण्यात येईल असेही नमूद केले आहे. सोबत खाली संपर्क म्हणून सिद्धार्थ सिंह राजावत यांचे नाव आणि फोन नंबर देण्यात आला आहे.
या पोस्टरवरून दोन्ही पक्षात चांगलीच जुंपली असून भाजप कार्यकर्त्यांनी या विरुद्ध झांसी रोड पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर, काँग्रेस नेते सिद्धार्थ राजावत यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर, इतरांचा शोध सुरू असल्याचे झांसी रोड पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक एम. राजोरिया यांनी सांगितले