नवी दिल्ली - लडाख सीमा वादावरून भारत विरोधी पत्रकारीता करत असल्याचे म्हणत प्रसारभारतीने 'प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया'ला(पीटीआय) सक्त ताकीद दिली आहे. तसेच एक पत्र पाठवून पीटीआयच्या सर्व संबधांचा आढावा घेतला जाईल, असे म्हटले आहे, यावरून वरिष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम आणि शशी थरुर यांनी पीटीआयची पाठराखण केली आहे.
प्रसारभारतीने पीटीआयला पाठवलेले पत्र तत्काळ माघारी घ्यावे असे, माजी अर्थमंत्री आणि वरिष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी ट्विट केले आहे. यासोबतच प्रसारभारती भारतीयांना दुसरी बाजू काय आहे, हे समजू देत नाही, अशी टीका वरिष्ठ काँग्रेस नेते शशी थरुर यांनी केली आहे.
पीटीआयने 25 जूनला चिनी राजदूत सन वेईंगडो यांची मुलाखत प्रदर्शित केली होती. यावरून प्रसारभारतीने पीटीआयला भारत विरोधी माहिती दाखवत असल्याचा आरोप केला होता. या मुलाखतीत सन यांनी गलवान खोऱ्यातील हिंसाचाराला भारत जबाबदार असल्याचे म्हटले होते. या हिंसाचारात 20 भारतीय जवान शहीद झाले होते.
'न्यूज रिपोर्टींग बाय पीटीआय नॉट ईन नॅशनल इंटरेस्ट' या शिर्षकाखाली प्रसारभारती बातमी सेवेचे प्रमुख समीर कुमार यांनी पीटीआयला पत्र पाठविले आहे. पीटीआयच्या प्रमुख विपनन अधिकाऱ्याच्या नावे हे पत्र लिहले आहे. पीटीआयच्या पत्रकारितेमुळे देशाच्या प्रादेशिक एकात्मतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे पत्रात म्हटले आहे.