नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील आपले राजकीय स्थान परत मिळवण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते जितीन प्रसाद यांनी उत्तर प्रदेशमधील जातीय राजकारणावर ज्येष्ठ पत्रकार अमित अग्निहोत्री यांना दिलेल्या मुलाखतीत प्रकाश टाकला आहे. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये फक्त एकच जागा मिळाली होती. अमेठीमध्येही राहुल गांधींना पराभव पत्कारावा लागला होता. राज्यातील ब्राम्हणांवरही अत्याचार होत असून मी त्यांना विश्वास देण्याचा प्रयत्न करत आहे की, त्यांच्या समस्या या दिल्ली किंवा लखनऊमध्ये ऐकल्या जातील, असे मुलाखतीमध्ये जितीन प्रसाद यांनी सांगितले.
- उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसपासून दूर झालेल्या ब्राम्हण समाजाला एकत्र आणण्याच्या आपल्या प्रयत्नांना कसा प्रतिसाद मिळत आहे ?
आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या ब्राह्मण चेतना परिषदेच्या बॅनरखाली हा एक अराजकीय उपक्रम आहे. त्यावेळी मी समाजातील लोकांना भेटण्यास सुरवात केली होती आणि लॉकडाऊन होईपर्यंत सुमारे 20 जिल्ह्यांचा मी दौरा केला होता. वाढत्या गुन्हेगारीबद्दल तेथील समाजामध्ये चिंता आहे. हे गुन्हे सरकार प्रायोजीत आहेत, असे मी म्हणत नाही. परंतु अशा प्रकारच्या गुन्ह्यांना ब्राम्हण बळी पडल्याचे अनेक पुरावे आहेत. उदाहरणार्थ, पश्चिम यूपीतील मैनपुरी येथील नवोदय विद्यालयातील एका मुलीवर अत्याचार करून त्यांची हत्या केली गेली. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची बदली झाली, पण कारवाई झाली नाही. मी त्या कुटूंबाला भेटलो. प्रियंका गांधी वाड्रा यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. त्यानंतर, पूर्व युपीच्या वस्तीत कबीर तिवारी नावाच्या मुलाची हत्या केली गेली. त्याचे कुटुंब अजूनही धक्क्यात आहे. झाशी, इटवा आणि सुलतानपूर अशी अनेक उदाहरणे आहेत.
- या उपक्रमाच्या माध्यमातून काय मिळवण्याची तुमची आशा आहे ?
समाजाला एकत्र करून त्यांना व्यासपीठ देण्याचे माझे ध्येय आहे. मी ऑनलाईन संवाद साधत असून नुकतच मी 30 जिल्हास्तरीय संवाद आयोजित केले आहेत. उर्वरित जिल्ह्यांचा पुढील महिन्यात समावेश होईल. या समुदायाला अनाथ वाटू नये, म्हणून मी त्यांना आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न करीत आहे, लखनऊ किंवा दिल्ली येथे त्यांचे ऐकणारे कोणी आहे.
- या उपक्रमाला तुम्ही अराजकीय म्हटलं आहे. तरीही लोकांकडून त्यामागील राजकीय हेतू शोधलं जाण स्वाभाविक आहे. यावर तुमची काय प्रतिक्रिया?
माझं ध्येय स्वत:ला उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मण नेता म्हणून सादर करणं नाही. तथापि, हे खरे आहे की राजकारण्यातील कोणत्याही हालचालीकडे राजकीय हेतू म्हणूनच पाहिले जाते. हा उपक्रम मतांसाठी नाही. म्हणूनच आम्ही हे ब्राह्मण चेतना परिषदेच्या बॅनरखाली करीत आहोत. कुणाचेही हक्क हिसकावून घेण्याचा या उपक्रमाचा उद्देश नाही. आम्ही समाजाच्या हक्कांसाठी लढत आहोत. या समुदायाचे राज्य सरकार आणि नोकरशाहीमध्ये केवळ प्रतिकात्मक प्रतिनिधित्व आहे.
- काँग्रेसने दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित यांनी 2017 मध्ये मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार म्हणून घोषणा करत उत्तर प्रदेशमधील 10 ब्राम्हणांची मते वळवण्याचा अपयशी प्रयत्न केला होता. 2022 च्या निवडणुकीवेळी पक्ष मुख्यमंत्री पदासाठी प्रोजेक्ट करेल?
मुख्यमंत्री पदासाठी उमेदवारांची घोषणा करणं हा एक रणनितीक निर्णय आहे. पक्षाच्या नेतृत्वाला जाणवेल, तेव्हा ते निर्णय घेतील. 2017 मध्ये आम्ही शीला दिक्षित यांच्यासाठी योजना आखल्या होत्या. मात्र, त्यांची उमेदवारी मागे घेण्यात आली. कारण, आम्ही समाजवादी पक्षासोबत आघाडी केली होती. मात्र, ते पूर्णपणे झाले नाही.
- काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांशिवाय इतर दलित, मुस्लीम मतदारांना आकर्षीत करण्यासाठी पक्षाच्या काही योजना आहेत का?
कायदा, नोकरी अशा इतर मुद्यांवर लक्ष केंद्रीत करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आमचे हे प्रयत्नच सर्व समाजाला प्रभावित करत आहेत. 2017 मधील काँग्रेस- समाजवादी पक्षाची आघाडी एक दुर्घटना होती.
- येत्या 2022 च्या निवडणुकीमध्ये तुम्ही समाजवादी पक्ष किंवा लोक दलाशी आघाडी कराल का ?
आम्ही कोणतीही आघाडी करणार नसून एकटेच निवडणूक लढणार आहोत. यासंदर्भात आम्ही तयारी ही सुरू केली आहे.
- भाजप जर येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये राम मंदिराचा मुद्दा उठवण्याचा प्रयत्न करेल, तर काँग्रेसची काय प्रतिक्रिया असेल ?
बरोबर, आमच्या नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांनी पक्षाची स्थिती स्पष्ट केली आहे. आम्ही मंदिराचे स्वागत करतो, हे पक्षाचे मत आहे.