गांधीनगर - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नुकतेच भारत दौऱ्यावर आले होते. त्यांच्या स्वागतासाठी अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर मोठ्या उत्साहात 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मात्र, ट्रम्प यांच्या अहमदाबाद दौऱ्यावर किती खर्च झाला यावरून टीका होत आहे. याला मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी उत्तर दिले आहे.
ट्रम्प यांच्या तीन तासाच्या अहमदाबाद दौऱ्यावर १०० कोटी रुपये खर्च झाल्याची टीका होत आहे. मात्र, १०० कोटी नाही तर साडेबारा कोटी रुपये खर्च झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने या दौऱ्यासाठी ८ कोटी रुपये मंजूर केले होते तर अहमदाबाद महानगरपालिकेने ४.५ कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र, १०० कोटींचा आकडा कोठून आला हे मला समजत नाही, असे मुख्यमंत्री रुपानी म्हणाले.
विरोधी पक्ष काँग्रेसने ट्रम्प दौऱ्यावर १०० कोटी रुपये खर्च केल्याचा दावा गुजरात विधानसभेत केला होता. गुजरात सरकारने ट्रम्प यांच्या तीन तासाच्या अहमदाबाद दौऱ्यावर १०० कोटी रुपये खर्च केल्याचे ट्विट काँग्रेस नेते अर्जुन मोधवाडिया यांनी केले होते.
२४ फेब्रुवारीला ट्रम्प आले होते अहमदाबादेत
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २४ फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर आले होते. त्यांच्या दौऱ्याची सुरुवात अहमदाबादेतून झाली होती. जगातील सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमवर ट्रम्प यांच्या स्वागतासाठी नमस्त ट्रम्प हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मोटेरा स्टेडियमचे त्यांनी उद्धाटनही केले. त्यानंतर ट्रम्प यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली. तसेच 'रोड शो'ध्ये सहभाग घेतला होता.
ट्रम्प यांच्या दौऱ्यानिमित्त अहमदाबाद शहराला सजविण्यात आले होते. ट्रम्प यांना झोपडपट्टी दिसू नये म्हणून रस्त्याच्या बाजूने मोठी भिंत बांधण्यात आली होती. फुटपाथ नव्याने बांधण्यात आले होते. शहराची स्वच्छता करण्यात आली होती. ट्रम्प यांच्या दौऱ्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता.