नवी दिल्ली - भारत-चीन सीमावादात एक लष्करी अधिकारी आणि दोन जवानांची हत्या धक्कादायक आणि कधीही स्वीकार्ह नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे. सोमवारी रात्री गलवान व्हॅली येथे दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये वाद झाला, त्यामध्ये तीन भारतीय सैनिकांना वीरमरण आले आहे. हे प्रकरण राष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
सीमेवर घडलेल्या या घटनेवरून सरकारने देशाला विश्वासात घ्यायला हवे. तसेच जमिनीवरची खरी परिस्थिती काय आहे, हे सर्व राजकीय पक्षांना सांगण्यासाठी बैठक बोलवावी. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेची खातरजमा करावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही घटना गांभीर्याने घेण्याची आहे, असे काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी म्हटले आहे.
'नियंत्रण रेषा आणि एकात्मतेसंबधी तडजोड नाही'
आम्ही मागणी करत असल्याप्रमाणे सरकारने देशाला विश्वासात घ्यावे. सर्व पक्षांना माहिती देण्यासाठी त्वरित बैठक बोलवावी. भारत- चीन सैनिकांमधील वादाप्रकरणी सरकार पारदर्शकता दाखत नाही. नियंत्रण रेषा आणि भारताची एकात्मतेशी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही, असे आनंद शर्मा म्हणाले. हे खूप धक्कादायक अविश्वसनीय आहे. संरक्षणमंत्री या वृत्ताला दुजोरा देतील का? असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते रणदिप सुरजेवाला यांनी ट्विटरवरून केला आहे.
सीमा वादाप्रकरणी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी 23 जूनला काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत चीन, नेपाळ सीमावादांसह कोरोना संकट, आर्थिक मंदी, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींवरही चर्चा करण्यात येणार आहे.
सोनिया गांधीच्या अध्यक्षतेखाली व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे. विशेष प्रतिनिधी, वरिष्ठ काँग्रेस नेते आणि काँग्रेसशासित राज्याचे मुख्यमंत्री या बैठकीत भाग घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सीमावाद सोडविण्यासाठी भारत हा चीन आणि नेपाळशी राजनैतिक आणि लष्करीस्तरावर चर्चा करत आहे. या प्रश्नासंबंधी सर्व विरोधी पक्षांना भाजपा सरकारने विश्वासात घ्यावे, अशी मागणी काँग्रेसची आहे.