नवी दिल्ली - गेल्या अनेक दिवसांपासून भारत-चीन सीमावादावर काँग्रेस पक्षातील इतर नेतेही पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. चीनने भारतीय सीमेवर मिसाईल तैनात केल्याप्रकरणी राजीव शुक्ला यांनी चिंता व्यक्त केली. तसेच मोदींनी येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये भारत-चीन सीमावादावर बोलावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
नुकत्याच मिळालेल्या माहितीतून आणि सॅटलाईट इमेजमधून गलवान खोऱ्यातील सद्य परिस्थिती समोर आली आहे. चीनने आंतरराष्ट्रीय सीमेवर क्षेपणास्त्र तैनात केले आहे. यामुळे आपल्या देशाच्या सुरक्षेस धोका निर्माण झाला आहे. त्यांनी त्यांचे लष्करही तैनात केले आहे, असे राजीव शुक्ला म्हणाले. सीलीगुरीमधील चीन-भारत सीमेवर चिनी सैनिकांच्या उपस्थितीचा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी 1 ऑगस्ट 2018 ला उपस्थित केला होता, असेही त्यांनी सांगितले.
मागील काही महिन्यांपासून भारत आणि चीन दरम्यान सीमा प्रश्नी वाद सुरू आहे. दोन्ही देशांमधील तणाव निवळण्याचा प्रयत्न सुरू असताना चीन सीमा भागात जोरदार हालचाली करत आहे. चीनने अरुणाचल आणि भूटान सीमेवरील तिबेटी नागरिकांना हटवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चीनला नेमके काय साध्य करायचे आहे, यावर चर्चा सुरू झाली आहे.