रुरकी - जेव्हा-जेव्हा शत्रूने देशाकडे तिरप्या नजरेने पाहण्याची हिम्मत केली, तेव्हा-तेव्हा आपल्या शूर शिपायांनी त्यांच्या सर्व कट कारस्थानांना मोठ्या बहादुरीने तोंड दिले. वेळप्रसंगी बलिदान द्यायलाही मागे-पुढे पाहिले नाही. कारगिल युद्धात देशाच्या या नायकांनी एक कथा लिहिली जी आठवून आजही प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानाने भरून येतो. हीच वीरगाथा कारगिल युद्धात सहभागी असलेले रुरकीचे कमांडर दिगंबर सिंह नेगी यांनी ईटिव्ही भारत समोर उलगडली.
भारतीय तुकडीचे कमांडर दिगंबर सिंह नेगी यांनी सांगितले की, कारगिल युद्धात विजय निश्चितच आव्हानात्मक होता. पाकिस्तानच्या गोळीबारात जखमी झाल्यानंतरही त्यांनी माघार घेतली नाही आणि टायगर हील सर करून विजय मिळवला.
आपल्या अनुभवांबद्दल सांगताना दिगंबर सिंह नेगी पुढे म्हणाले "आम्ही आमच्या मोहिमेवर नियोजित पद्धतीने पुढे जात होतो. पाकिस्तानी सैनिक इतक्या उंच ठिकाणावर होते की, भारतीय सैनिकांवर सहज लक्ष ठेवू शकतील. अत्यंत धोकादायक असा खडकाळ मार्ग पार करून त्या उंचीपर्यंत पोहोचणे भारतासाठी एक आव्हान होते. परंतु, पाकिस्तानी सैन्याला धूळ चारण्याची महत्वाकांक्षा उराशी बाळगून आम्ही लढत राहिलो आणि कारगिलची विजयी गाथा लिहिली."